layoff On Google Meeting : मागील वर्षापासून सुरू असणारे मंदीचे सावट अजूनही सरण्याची चिन्हं नाहीत. आता अमेरिकन स्टार्टअप फ्रंट डेस्क कंपनीने (Frontdesk) वर्षातील पहिली नोकर कपात केली आहे. या कंपनीने अवघ्या 2 मिनिटांच्या व्हर्च्युअल कॉलद्वारे आपल्या 200 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. 'टेकक्रंच'च्या वृत्तानुसार, कर्मचार्यांची Google मीटवर 2 मिनिटांसाठी मिटिंग घेण्यात आली. या दोन मिनिटांच्या मिटिंगमध्ये कर्मचाऱ्यांना नोकर कपातीची माहिती देण्यात आली.
कंपनीच्या सीईओंनी काय म्हटले?
वृत्तानुसार, स्टार्टअप कंपनी फ्रंटडेस्कचे सीईओ जेसी डीपिंटो यांनी कॉल दरम्यान कंपनीच्या आर्थिक संकटाबद्दल कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यासोबतच कंपनीकडून आता दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी अर्ज देण्यात येणार असल्याचे संकेतही दिले. याचा अर्थ कंपनीला स्वतःला दिवाळखोर घोषित करायचे आहे. यासाठी लवकरच अर्जही दिला जाऊ शकतो. व्हर्च्युअल बैठकीदरम्यान सीईओने सांगितले की स्टार्टअपचे बिझनेस मॉडेल वेगवेगळ्या आघाड्यांवर संघर्ष करत आहे. JetBlue Ventures आणि Veritas Investments सारख्या गुंतवणूकदारांकडून अंदाजे 26 दशलक्ष डॉलरचा निधी उभारूनही, कंपनीला आव्हानांचा सामना करावा लागला.
कंपनी करते काय?
स्टार्टअप फ्रंटडेस्कची स्थापना 2017 मध्ये झाली. या कंपनीला अमेरिकेत 1,000 हून अधिक अपार्टमेंट्स मॅनेजमेंट करण्याचा अनुभव आहे. अलीकडेच या कंपनीने विस्कॉन्सिन येथील प्रतिस्पर्धी जेनसिटी ताब्यात घेतली आहे. अवघ्या सात महिन्यांतच नोकर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मालमत्तेचे भाडे भरण्यात अडचण येत असल्याने कंपनीला आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत कंपनीला मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला.
झेरॉक्समध्येही टाळेबंदी
3 जानेवारी रोजी झेरॉक्सने 15 टक्के कर्मचारी कमी करण्याचा आपला निर्णय जाहीर केला. एका वृत्तानुसार, कंपनीत सुमारे 20,500 कर्मचारी होते. या नोकर कपातीच्या घोषणेचा अंदाजे 3,000 कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. झेरॉक्स ही अमेरिकन कंपनी डिजिटल प्रिंटिंग आणि दस्तऐवज व्यवस्थापन तंत्रज्ञानामध्ये सक्रिय आहे.
नव्या वर्षापूर्वीच 'पेटीएम'मध्ये नोकर कपात
नवीन वर्ष 2024 सुरू होण्यापूर्वी पेटीएमने आपल्या कर्मचाऱ्यांना धक्का दिला. पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्सने (One 97 Communications) 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं असल्याचे वृत्त समोर आले. Paytm नं खर्चात कपात आणि व्यवसाय सुव्यवस्थित करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही मोठी नोकर कपात केली आहे. त्याशिवाय, आवश्यकता भासल्यास आगामी काळात आणखी नोकर कपात केली जाऊ शकते.