CISCO Layoffs: आयटी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांवर मंदीचे सावट दिसत असून काही कंपन्यांमधून कर्मचारी कपातीला सुरुवात झाली आहे. आता सिस्को या आयटी कंपनीतही नोकर कपात करण्यात येणार आहे. सिस्कोमधून पाच टक्के कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावण्यात येणार आहे.
सिलिकॉन व्हॅली बिझनेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, सिस्कोमध्ये जवळपास 4100 कर्मचारी कपात होणार आहे. जगभरात सिस्कोचे 83,000 हजार कर्मचारी आहेत. व्यवसायात 'पुनर्संतुलन' करण्यासाठी कर्मचारी कपात करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
यंदाच्या पहिल्या तिमाही निकालात सिस्कोचे 13.6 अब्ज डॉलर इतके उत्पन्न नोंदवण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांची अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
सिस्कोचे अध्यक्ष आणि सीईओ चक रॉबिन्स यांनी कंपनीतील नोकरकपातीबाबत कोणतेही भाष्य केले नाही. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांशी अधिक तपशीलवारपणे संवाद साधत नाही. तोपर्यंत आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही. आम्ही व्यवसायात संतुलन आणण्यासाठी प्रयत्न करत असून काही प्राथमिकता, प्राधान्यदेखील निश्चित करत आहोत, असेही त्यांनी म्हटले.
सिस्कोचे मुख्य आर्थिक अधिकारी स्कॉट हेरेन यांनी म्हटले की, आम्ही काही प्राधान्यक्रम निश्चित करत आहोत. काही क्षेत्रांमध्ये आम्हाला अधिक गुंतवणूक करायची आहे. सिक्युरिटी, क्लाउड डिलिव्हरर्ड प्रोडक्ट अशा उत्पादनांकडे लक्ष देत आहोत.
त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही ज्या नवीन क्षेत्रात गुंतवणूक करत आहोत, त्या क्षेत्रात निर्माण झालेल्या रोजगाराची संख्या पाहिल्यास या नोकरकपातीचा परिणाम फार कमी लोकांवर झालेला असू शकतो.
आम्ही आमच्या कर्मचार्यांना त्या भूमिकांशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. तिथे कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा कस लागणार आहे.
दरम्यान, जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स आणि रिटेल कंपनी ॲमेझॉनने 10,000 कर्मचाऱ्यांची नोकर कपात करण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्ट, ट्वीटर, मेटादेखील नोकरकपातीची घोषणा केली आहे. ॲमेझॉन कंपनीमध्ये सुमारे 16,08,000 कर्मचारी असून त्यापैकी एक टक्के कर्मचाऱ्यांची नोकर कपात करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत चढउतार सुरू आहेत. अमेरिका, युरोपीन देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: