नवी दिल्ली : भारतासह जगभरात सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. सोन्याचं दुहेरी महत्त्व आहे. भारतात सोन्याच्या दागिण्यांना महत्त्व आहे तर दुसरीकडे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून देखील गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत असतात. भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात केली जाते. सोन्याचा वापर विविध कामांसाठी केला जातो. दागिने, सर्जरी, कनेक्टर, स्विच आणि मायक्रोचिप्समध्ये देखील सोनं वापरलं जातं. भारतातील सोन्याचं सर्वात मोठं मार्केट कुठं आहे हे अनेकजणांना माहिती नसतं, जिथून संपूर्ण देशभरात सोन्याचा पुरवठा होतो. जळगाव आणि रतलामचा सोन्याचा सराफा बाजार लोकप्रिय आहे. मात्र, ते देशातील सर्वात मोठे बाजार नाहीत.
देशातील सर्वात मोठा सराफा बाजार मुंबईतील झवेरी येथे आहे. याशिवाय केरळच्या त्रिशूरला गोल्ड कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलं जातं. भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथील झवेरी बाजाराला देशातील सर्वात मोठा बाजार म्हटलं जातं. हा आशियातील सर्वात मोठा सोन्याचा बाजार मानला जातो. मुंबईचा झवेरी बाजार 160 वर्षू जुना आहे. 1864 मध्ये सराफा व्यापारी त्रिभुवनदास झवेरी यांनी याची सुरावत केली होती. तेव्हापासून या बाजाराला झवेरी बाजार म्हटलं जातं.
झवेरी बाजारातून देशातील सर्व भागात सोन्याच्या दागिन्यांचा पुरवठा केला जातो. इथं तयार झालेले दागिने चांगल्या गुणवत्तेचे आणि शानदार डिझाईनचे असते. इथं हिऱ्यांचा कारभार देखील होतो. सामान्यपणे झवेरी बाजारात होलसेल किंवा मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होते. यामुळं मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत असल्यानं कमी दरात दागिने मिळतात. तर, रिटेल दागिने खरेदी करत असल्यास सूट मिळत नाहीत. सोन्याचे दागिने खरेदी बाजारभावाप्रमाणं असतात.
त्रिशूरला गोल्ड कॅपिटल का म्हटलं जातं? (Gold Capital)
केरळच्या त्रिशूरला गोल्ड कॅपिटल म्हटलं जातं याचं कारण हे शहर सोन्याचे व्यापार आणि दागिने निर्मितीचं प्रमुख केंद्र आहे. त्रिशूरमध्ये अनेक कारखाने आणि कारागीर आहेत. जे मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने बनवतात. दक्षिण भारतातील सोन्याच्या व्यापाराचं प्रमुख केंद्र आहे.याशिवाय भारतातील सोन्याचे दुसरे प्रमुख बाजार महाराष्ट्रातील जळगाव आणि मध्य प्रदेशच्या रतलाम, दिल्लीतील सराफा बाजार आहे.
सोन्याचा आजचा दर
सोन्याच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 110650 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीचा एक किलोचा दर 129350 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्यातील गुंतवणूकदारांना दरवाढीमुळं 50 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.