Financial Rules Changing From 1st April 2023: दर महिन्याच्या एक तारखेला नवीन आर्थिक नियम लागू होतात. त्याचा परिणाम  येत्या काही दिवसात मार्च महिना संपणार आहे. मार्च महिन्यासोबत यंदाचे आर्थिक वर्षदेखील संपणार आहे. एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत. काही नियमात बदल होणार असून वाहने आणि इतर गोष्टींचे दर वाढणार आहेत. जाणून घ्या एक एप्रिलपासून नेमकं काय बदलणार?



1. ...तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होणार


केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंत अंतिम मुदत निश्चित केली आहे. या मुदतीत तुम्ही दोन्ही कागदपत्रे लिंक न केल्यास, पॅन निष्क्रिय केले जाणार आहे. यानंतर, ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला ते आधारशी लिंक करताना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.


2. अनेक कंपन्यांच्या गाड्या होणार महाग


भारत स्टेज-2 च्या अंमलबजावणीमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू, टोयोटा आणि ऑडी अशा अनेक कंपन्यांच्या वाहनांच्या किमती वाढणार आहेत. सर्व कंपन्यांनी त्यांचे नवीन दर 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते, वेगवेगळ्या कंपन्यांच्या कारची किंमत 50,000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 


3.  6 अंकी हॉलमार्क नसलेले सोन्याची विक्री नाही


1 एप्रिल 2023 पासून भारतात सोन्याच्या विक्रीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. 1 एप्रिलपासून, ज्वेलर्स 6 अंकी HUID क्रमांक नोंदणीकृत असलेल्या सोन्याची विक्री करू शकणार आहेत. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ग्राहक विभागाने 18 जानेवारी 2023 रोजी हा निर्णय घेतला आहे. पूर्वी HUID ऐच्छिक होता. मात्र, ग्राहक हॉलमार्क चिन्हाशिवाय जुने दागिने विकू शकतील.


4. जास्त प्रीमियम असलेल्या विमा पॉलिसींवर कर भरावा लागेल


तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम पॉलिसी खरेदी करणार असाल तर तुमच्या खिशावर ताण येऊ शकतो. सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती की 1 एप्रिल 2023 पासून वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या विमा योजनेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागणार असल्याचे म्हटले होते. यातून युलिप योजनेला वगळण्यात आले आहे.


5. डिमॅट खात्यात नामांकन आवश्यक आहे


शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डिमॅट खातेधारकांनी 1 एप्रिल 2023 पूर्वी नॉमिनीचे नामांकर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास खातेधारकांचे खाते गोठवले जाणार आहे. सेबीच्या परिपत्रकानुसार, डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यात नॉमिनी जोडणे आवश्यक आहे. तसे न केल्यास तुमचे डिमॅट अकाउंट गोठवले जाईल.


6. म्युच्युअल फंडामध्ये नॉमिनी आवश्यक 


सेबीने सर्व म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना 31 मार्चपूर्वी त्यांचे नॉमिनी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास, 1 एप्रिल 2023 पासून, गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ गोठवला जाईल. त्यानंतर तपशील सबमिट केल्यानंतरच ते पुन्हा सुरू होईल.


7. दिव्यांगजनांसाठी UDID अनिवार्य


दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ आता 1 एप्रिलपासून दिव्यांगांना युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (यूडीआयडी) क्रमांक सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे यूडीआयडी नाही, त्यांना त्यांच्या यूडीआयडी नोंदणी क्रमांकाची माहिती द्यावी लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानंतरच तो 17 सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो.


8. इतके दिवस बँका बंद राहतील


एप्रिल महिन्यात बँकांना सुट्या असतात. या महिन्यात विविध सण आणि वर्धापन दिनांमुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये आंबेडकर जयंती, महावीर जयंती, ईद-उल-फित्र यांसारख्या दिवसांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात साधारणपणे 11 दिवस बँकां बंद असणार आहेत.


9. NSE वरील व्यवहार शुल्कात 6 टक्के वाढ मागे घेणार


नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने यापूर्वी कॅश इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर 6 टक्के शुल्क आकारले होते.  1 एप्रिलपासून हे शुल्क मागे घेतले जाणार आहे. यापूर्वी जानेवारी 2021 मध्ये हे शुल्क सुरू करण्यात आले होते.


10. LPG आणि CNG च्या किमतीत बदल होऊ शकतो


दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्या गॅस आणि सीएनजीच्या दरात बदल करतात. अशा स्थितीत व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार की घट होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.