Changes From 1st February:  एक फेब्रुवारी 2022 पासून देशातील अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. यामध्ये बँकिंगपासून स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात बदल होणार आहेत. एक फेब्रुवारीपासून बदलण्यात येणाऱ्या नियमांमुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहेत. 


एसबीआयच्या IMPS सेवेत बदल


स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेच्या व्यवहाराच्या दरात कोणताही बदल झाल्यास त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होतो. 1 फेब्रुवारीपासून बँकेच्या IMPS दरांमध्ये मोठा बदल होणार आहे. स्टेट बँक यापुढे 2 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS वर कोणतेही शुल्क आकारणार नाही. मात्र, दोन ते पाच लाखांपर्यंतच्या व्यवहारासाठी 20 रुपयांसह जीएसटी इतकं शुल्क आकारणार आहे


पंजाब नॅशनल बँकेचा कठोर नियम


पंजाब नॅशनल बँकेनेही आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या अंतर्गत, खात्यात पैसे नसल्यामुळे तुमचा हप्ता किंवा गुंतवणूक अयशस्वी झाल्यास, तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. आतापर्यंत दंडाची रक्कम १०० रुपये होती.


बँक ऑफ बडोदाच्या नियमात बदल


एक फेब्रुवारीपासून बँक ऑफ बडोद्याच्या काही नियमांमध्ये बदल होत आहेत. धनादेश वटवण्याबाबतच्या एका नियमाचा समावेश आहे. त्यानुसार आता Bank Of Barodaच्या ग्राहकांना एक फेब्रुवारीपासून धनादेशाद्वारे रक्कम काढण्यासाठी पॉझिटीव्ह पे सिस्टम फॉलो करावी लागणार आहे. सध्या धनादेशाशी निगडीत माहिती दिल्यानंतरच धनादेश वटणार आहे. हा नियम 10 लाखांपेक्षा अधिक रक्कमेसाठी लागू होणार आहे. 


गॅस सिलेंडरच्या दरात बदल?
 
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल होत असतो. यंदा एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याशिवाय पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या दरात कोणता बदल होतोय याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.