KFin Technologies Listing: केफिन टेक्नॉलॉजीच्या आयपीआयोची आज शेअर बाजारात लिस्टिंग झाली. आज, गुरुवारी KFin Technologies चे शेअर्स बाजारात लिस्ट झाले. KFin Technologies मुंबई शेअर बाजारात 0.82 टक्क्यांच्या प्रीमियमसह 369 रुपयांवर लिस्ट झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजारावर 367 रुपयांवर सूचीबद्ध झाला. KFin Technologies च्या आयपीओत प्रति शेअर 366 रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती. बाजारात शेअर लिस्ट झाल्यानंतर घसरण सुरू झाली.
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, KFin Technologies चा शेअर दर 2.35 टक्क्यांच्या घसरणीसह 357 रुपयांवर व्यवहार करत होता. त्यामुळे आयपीओत शेअर मिळालेल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 10 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य?
शेअर बाजारातील तज्ज्ञांनुसार, हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीत हा शेअर चांगला परतावा देईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सध्या बाजारात सुरू असलेल्या घसरणीची चिंता करू नये असेही तज्ज्ञांनी म्हटले. KFin Technologies ही भारतीय म्युच्युअल फंडमधील सर्वात मोठी इन्वेस्टर सोल्यूशन प्रोवाइडर कंपनी आहे.
KFin Technologies च्या IPO च्या लिस्टिंगनंतर कंपनीचे बाजार मूल्य 5906 कोटी रुपये इतके झाले. IPO 19 डिसेंबर रोजी उघडला गेला आणि गुंतवणूकदारांना 21 डिसेंबरपर्यंत आयपीओत बोली लावण्यासाठीची मुदत होती. हा IPO फक्त 2.59 पटीने सबस्क्राइब झाला. ज्यामध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 4.17 पटीने सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 1.23 पटीने सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार केवळ 23 टक्के कोटा भरू शकले. Kefin Technologies ने IPO द्वारे 1500 कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने 10 च्या दर्शनी मूल्याच्या शेअरसाठी, IPO ची किंमत 347-366 दरम्यान कंपनीने निश्चित केली होती.
शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम?
शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम लँडमार्क कार्सच्या आयपीओ लिस्टिंगवर झाला. लँडमार्क कार्सच्या आयपीओत 506 रुपये प्रति शेअर इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती. बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर लँडमार्क कार्सच्या शेअर दरात घसरण सुरू आहे. सध्या या कंपनीचा शेअर 452 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. Abans Holdings कंपनीच्या शेअर दरात लिस्टिंगनंतर घसरण सुरू आहे.
(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)