Kaynes Technology Listing Price: Kaynes Techonology कंपनी आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. (Kaynes Techonology India Listing In Share Market) केन्स टेक्नॉलॉजीचा शेअर प्रीमियम दरासह बाजारात लिस्टिंग झाले. केन्स टेक्नॉलॉजीचा शेअर 778 रुपयांच्या दरावर राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. मात्र, सुरुवातीच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांकडून नफावसुली दिसून आल्याने शेअर दरात घसरण दिसून आली. 


सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास केन्स टेक्नॉलॉजीचा शेअर 20.15 टक्क्यांनी वधारून 705 रुपयांवर व्यवहार करत होता. हा शेअर 675 रुपयांपर्यत घसरला होता. त्यानंतर पुन्हा एकदा खरेदीचा जोर दिसून आला. 


केन्स टेक्नॉलॉजीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आयपीओ 34.16 पटीने सब्सक्राइब झाला होता. केन्स टेक्नॉलॉजीने आयपीओमध्ये 559 ते 587 रुपये इतका शेअर बँड निश्चित केला होता. आयपीओमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. संस्थांत्मक गुंतवणूकदारांसाठी असलेला आरक्षित कोटा 98.47 पटीने सब्सक्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 4.09 पटीने सब्सक्राइब झाला होता. 


Kaynes Techonology ने 257 कोटी रुपये अँकर गुंतवणूकदारांकडून जमवले आहेत. अँकर गुंतवणूकदारांना 587 रुपये प्रति शेअर दराने शेअर्स वाटप करण्यात आले आहे. अँकर गुंतवणूकदारांना 43.67 लाख शेअर्स अलॉट करण्यात आले. 


कंपनी करते काय?


Kaynes Techonolog ही एक अग्रगण्य एंड-टू-एंड आणि IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) सोल्यूशन्स सक्षम इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. 


ऑटोमोटिव्ह, औद्योगिक, एरोस्पेस आणि संरक्षण, बाह्य-अंतराळ, आण्विक, वैद्यकीय, रेल्वे, इंटरनेट ऑफ थिंग्ज, माहिती तंत्रज्ञान (आयटी) या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांसाठी संकल्पनात्मक डिझाइन, प्रक्रिया अभियांत्रिकी, एकात्मिक उत्पादन करण्याचा अनुभव कंपनीकडे आहे. 


कर्नाटक, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तराखंड या राज्यात कंपनीचे आठ प्रकल्प आहेत. 


निधीचा वापर कुठे करणार?


Kaynes Technology कंपनी आयपीओतून मिळालेल्या रक्कमेचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि म्हैसूर आणि मानेसर येथील प्रकल्पाच्या सुविधांसाठीच्या भांडवली खर्चाच्या निधीसाठी वापरण्यात येणार आहे. 


सोमवारीही झाली दोन कंपन्यांची लिस्टिंग


दरम्यान, सोमवारी फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स (Five Star Business Finance) आणि आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज (Archean Chemical Industries) या दोन कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्या. आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजने शेअर बाजारात दमदारपणे पदार्पण केले. आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजचा शेअर 10 टक्के प्रीमियम दराने लिस्ट झाली. एनएसईवर 450 रुपये प्रति शेअर आणि बीएसईवर 449 रुपयांवर लिस्ट झाला. तर, दुसरीकडे  फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्सचा शेअर 5 टक्के डिस्काउंट दरावर सूचीबद्ध झाला.