नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून गौतम अदानी (Gautam Adani) हे नाव सातत्यानं चर्चेत आहे. एका वर्षात अदानी ग्रुपचे शेअर्स इतक्या वेगानं वाढले की जगातल्या श्रीमंतांच्या यादीतही त्यांनी झपाट्यानं वरचं स्थान मिळवलं. मात्र आज शेअर बाजारात याच अदानींबद्दल एका बातमीनं संशयाचं वातावरण निर्माण केलंय. अदानी ग्रुपच्या बाजारातल्या आपटीनंतर दिवसभर सुचेता दलाल हे एक नावही चर्चेत राहिलं आहे.


शेअर बाजारातला आजचा दिवस हा अदानी ग्रुपसाठी काळा दिवस होता. एकाच दिवसात अदानी ग्रुपचे शेअर्स 5 ते 20 टक्यांनी आपटले. अदानींना हा झटका सुचेता दलाल यांच्या एका ट्विटनं बसला का याची जोरदार चर्चा ट्विटरवर सुरु झाली.


 सुचेता दलाल यांचं ते ट्विट आणि गौतम अदानींच्या शेअर्समधली आपटी याचं कनेक्शन नेमकं काय? 


गौतम अदानी...2020 म्हणजे कोरोना लॉकडाऊनच्या काळात जिथं सगळेजण आर्थिक नुकसानीचे आकडे मोजत होते. त्याच वर्षात या एका उद्योगपतींच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली. अदानी ग्रुपचे काही शेअर्स एका वर्षात दुप्पट ते दहापट वाढले होते. पण गेल्या वर्षभरात शेअर बाजारात जबरदस्ती मुसंडी मारणाऱ्या अदानी ग्रुपच्या शेअर्स आज भूकंप झाल्यासारखे हादरले. एकाच दिवसात अदानी ग्रुपचं भांडवली बाजारातलं मूल्य तब्बल 1 लाख 3 हजार कोटी रुपयांनी कमी झालं आणि याला कारण ठरली एक बातमी...


अदानी ग्रुपचे शेअर्स अचानक का आपटले?


नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात एनएसडीएलने अदानी ग्रुपमध्ये पैसे गुंतवलेल्या तीन विदेशी फर्मचे खाती गोठवल्याची बातमी समोर आली.अल्बुला इन्वेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्वेस्टमेंट फंड या तीन फर्ममधले तब्बल 43 हजार कोटी रुपयांचे शेअर्स गोठवण्यात आले. अदानी ग्रुपच्या शेअर्समधली गेल्या वर्षभरातली वाढ ही कृत्रिम आहे का याबाबतही सेबी तपास करण्याची शक्यता निर्माण झाली.


सुचेता दलाल यांनी 12 जून रोजी म्हणजे शनिवारी सकाळी हे ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी कुठल्याही कंपनीचं नाव घेतलेलं नव्हतं, पण एका गंभीर घोटाळ्याचा इशारा मात्र दिला होता. एनएसडीएलनं अदानी ग्रुपचे हे शेअर्स 31 मे पूर्वीच गोठवल्याचं सांगितलं जातंय पण ही माहिती आत्तापर्यंत उजेडात आली नव्हती. सुचेता दलाल यांच्या ट्विटपाठोपाठ आज इकॉनॉमिक टाईम्स या इंग्रजी दैनिकातही या प्रकाराची बातमी छापून आली.






 मार्केटमध्ये आज अदानी ग्रुपला बसलेला झटका आणि त्या भूकंपाचं केंद्र सुचेता दलाल यांचं ट्विट असं मानत सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरश: पाऊस पडला. एलॉन मस्क यांच्या ट्विटनं जसं बिटकॉईनचे भाव वरखाली होतात तसं सुचेता दलाल यांच्या ट्विटनं अदानी ग्रुपचे शेअर्स हलवल्याची कमेंट नेटिझन्स करु लागले.


कोण आहे सुचेता दलाल?


सुचेता दलाल या देशातल्या प्रसिद्ध बिझनेस पत्रकार आहेत. 1992 चा हर्षद मेहता घोटाळा, 2001 चा केतन पारेख घोटाळा याशिवाय एनरॉन प्रकल्पातल्या गैरव्यवहारालाही त्यांनी उजेडात आणलं होतं. त्यांच्या द स्कॅम या हर्षद मेहता घोटाळ्यावरच्या पुस्तकावर आधारित एक वेबसीरीजही नुकतीच तयार झाली होती.


 जगातल्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी हे 14 व्या क्रमांकावर आहेत. मागच्या एका वर्षात अदानींच्या संपत्तीत कमालीच्या वेगानं वाढ झाली. त्यांच्या ग्रुपचे शेअर्स अवघ्या एका वर्षात दहा पटीपर्यंत वाढले आहेत. काही काळासाठी त्यांनी मुकेश अंबानींनाही मागे टाकलं पण आता एका बातमीनं अदानी ग्रुपबद्दल संशयाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे हा केवळ शेअर बाजारातला एक बुडबुडा आहे की मोठं वादळ हे लवकरच ठरेल. 


संबंधित बातम्या :