ITR Filing Last Date: आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिले आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरनंतर आयकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे.
आयकर विवरणपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या आठवड्यात लाखो लोकांनी विवरणपत्र दाखल केले असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार, 29 डिसेंबर 2021 रोजी 23,24,253 आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले होते. बुधवार, 29 डिसेंबर 2021 पर्यंत 5,09,58,559 इतके आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले होते. 28 डिसेंबर 2021 रोजी 18,89,057 आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहे. या आधी 27 डिसेंबर रोजी 15.49 लाख आयकर विवरणपत्र दाखल झाले होते.
31 डिसेंबर नंतर दंड भरावा लागणार
31 डिंसेबरनंतर आर्थिक वर्ष 2020-21 साठीचे आयकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बुधवार, 28 डिसेंबरपर्यंत 4,86,34,306 आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी ITR
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी लोकांनी आयकर विवरणपत्र भरले आहेत. आयकर विभागानुसार, 2019-20 या आर्थिक वर्षासाठी एकूण 5.95 कोटी ITR दाखल करण्यात आले होते. मुदत संपेपर्यंत मागील वर्षाचा आकडा ओलांडला जाऊ शकतो.
आयकर विभागाचा दिलासा
आयकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये आयकर विवरणपत्राचे आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन केले नाही, असे करदाते ही प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करू शकतात. आयकर विभागाच्या या निर्णयामुळे अनेक करदात्यांना दिलासा मिळणार आहे.
नियमांनुसार, डिजीटल स्वाक्षरीशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपात आयकर विवरणपत्र दाखल करण्यावर त्याचा आधार ओटीपी, नेटबँकिंग, डिमॅट खात्याद्वारे पाठवण्यात आलेला कोड व्हेरिफाय करावा लागतो. हे ई-व्हेरिफिकेशन आयकर दाखल केल्यानंतर 120 दिवसांमध्ये करावे लागते. त्याशिवाय करदाते बंगळुरूमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) कार्यालयात आयटीआर कार्यालयात एक प्रत पाठवून व्हेरिफिकेशन करता येऊ शकते. ही व्हेरिफिकेशन प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही. तो पर्यंत आयकर विवरण दाखल केले नाही, असे म्हटले जाते.