मुंबई : मुलाने इंजिनिअर व्हावे आणि मोठ्या पगाराची नोकरी करावी, असं सर्वसाधारण स्वप्न मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांचं असतं. मात्र, गेल्या काही वर्षात इंजिनिअरींगच्या (Engineer) क्षेत्रातील मंदीमुळे नोकऱ्या कमी झाल्या असून फ्रेशर नोकरी शोधणाऱ्यांना कमी पगाराचं पॅकेज मिळत असल्याने अनेकांनी इंजिनिअरींगनंतर नोकरीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते आहे. त्यातच, आता आटी क्षेत्रातील नावाजलेल्या कॉग्नीझंट कंपनीनेही कंपनीत नव्याने जॉईनिंग करणाऱ्या इंजिनिअरींगला दिलेल्या पॅकेजमुळे आता त्या कंपनीच्या सीईओंना नेटीझन्सने ट्रोल केलं आहे. कॉग्नीझंट कंपनीचे सीईओ रवी कुमार (Congnizant) सिंगीसेट्टी यांना ट्रोल केलं आहे. कंपनीने कॅम्पस इंटरव्हूव्हमध्ये नव इंजिनिअर्संना केवळ 2.5 लाख रुपये वार्षिक पॅकेज (Job) ऑफर करण्यात आल्यानंतर नेटीझन्सने कंपनीच्या सीईओंच्याच पगारीचा आकडा काढल्याचं दिसून आलं.  


कॉग्नीझंट कंपनीने दिलेल्या ऑफरवरुन आता सोशल मीडियावर ट्रोल आणि मिम्सही व्हायरल होत आहेत. त्यावरुन,कंपनीच्या सीईओंना लक्ष्य केलं जात असून इंजिनिअरींगची देशातील अवस्थाही ट्रोल होत आहे. तसेच, नव्या इंजिनिअर्संना 2.5 लाख रुपये वार्षिक पगार ऑफर करणाऱ्या कंपनीचे सीईओ रवि कुमार सिंगीसेट्टी यांच्या पगाराचा आकडा डोळे दिपवणारा आहे. रवि कुमार यांच्या वार्षिक पॅकेजवरील शून्य तरी मोजता येतील का, असेही काही नेटीझन्सने म्हटले आहे.  रवि कुमार यांनी ज्यादिवशी कंपनी ज्वॉईन केली होती, त्याचदिवशी ते पगाराच्या आकड्यावरुन चर्चेत आले होते.  


रवि कुमार हे यापूर्वी इन्फोसिसमध्ये प्रेसीडेंट होते, गतवर्षीच त्यांनी कॉग्नीझंट कंपनीत सीईओचा पदभार स्वीकारला. मुकेश अंबानी यांच्या 2020 मधील पगारापेक्षा त्यांचा पगार चारपट अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. आयटी क्षेत्रात 20 वर्षांपेक्षा अधिक काळ रवि कुमार यांनी व्यतीत केला आहे. विशेष म्हणजे भाभा परमाणु अनुसंधान केंद्रातही परमाणु वैज्ञानिक म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवाती केली होती. तर, 2016 मध्ये ते इन्फोसीस कंपनीमध्ये प्रेसीडेंट पदावर कार्यरत होते. कंपनीतील बोर्डाच्या अध्यक्षपदावरही त्यांनी काम केलं आहे. GQ च्या वृत्तानुसार, रवि कुमार यांनी जानेवारी महिन्यात कॉग्नीझंट कंपनीत कामाला सुरुवात केली होती. त्यावेळी, त्यांना 6 कोटी रुपये बोनस मिळाला होता, तसेच त्यांचे वार्षिक पॅकेज 70 लाख डॉलर म्हणजेच 57 कोटी रुपये एवढं आहे. त्यामुळे, इंजिनिअर्संना वार्षिक 2.5 लाख रुपये ऑफर देणाऱ्या सीईओंना नेटीझन्सकडून ट्रोल केलं जात आहे. 


इंजिनिअरींगमध्ये कमी पगारीच्या ऑफर्स


दरम्यान, आयटी क्षेत्र जवळपास वर्षभरापासून आर्थिक मंदीच्या छायेत आहे. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. लाखो कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांवरून कमी केले जात आहे. तसेच अनेक कंपन्यांनी या वर्षी कॅम्पस प्लेसमेंट केलेले नाही. कॅम्पसबाहेरील नोकऱ्यांची स्थितीही वाईट आहे. मोठमोठ्या कंपन्या फ्रेशर्सना कमी पगाराच्या जॉब ऑफर देत आहेत. कॉग्निझंटच्या अशाच एका ऑफरची सध्या सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. कंपनीने फ्रेशरला 2.5 लाख रुपये वार्षिक पगार देऊ केला आहे.