Tech Sector Layoff News : आयटी कंपन्यांमध्ये (IT Companies) मोठ्या प्रमाणात नोकरकपात (Layoff) केली जात आहे. काही केल्या या क्षेत्रातील नोकरकपात थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या क्षेत्रातील Intel, Cisco, IBM सारख्या छोट्या टेक स्टार्टअप कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यात सुमारे 27,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. तर 2024 मध्ये 422 कंपन्यांनी सुमारे 136000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे.


Intel 15000 नोकऱ्यांची संख्या कमी करणार 


इंटेलने दिलेल्या माहितीनुसार, 15000 नोकऱ्यांची संख्या कमी करणार आहे, जे त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 15 टक्के आहे. कंपनीने 2025 पर्यंत 10 अब्ज डॉलर खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नोकऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय त्याचाच परिणाम आहे. कंपनीचे सीईओ पॅट गेल्सिंगर यांनी कमकुवत आर्थिक परिणामांसाठी महसूल वाढीचा वेग, जास्त खर्च आणि घटता नफा याला जबाबदार धरले आहे. दरम्यान, सध्या अनेक कंपन्या नोकरकपातीचा निर्णय घेताना दिसत आहेत. त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


Cisco कंपनी कर्मचारी संख्या 7 टक्क्यांनी कमी करणार


आघाडीची टेक कंपनी असलेल्या Cisco ने देखील आपले जागतिक कर्मचारी संख्या 7 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सुमारे 6000 कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. 2024 मध्ये ही दुसरी वेळ आहे जेव्हा Cisco या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. IBM चीनमधील संशोधन आणि विकास सुविधा बंद करणार आहे. यामुळे आयबीएमने 1000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आयटी हार्डवेअरच्या मागणीत घट झाल्यामुळे कंपन्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. Apple ने अलीकडेच आपल्या सेवा विभागातील सुमारे 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.


GoPro चा 15 टक्के कामगार कमी करण्याचा निर्णय


ॲक्शन कॅमेरा निर्माता GoPro ने 15 टक्के कामगार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं 2024 च्या अखेरीस 140 लोकांना कामावरुन काढले जाण्याची शक्यता आहे. त्याच वर्षी, Apple ने काही प्रकल्प बंद केल्यामुळे 600 लोकांना स्पेशल प्रोजेक्ट ग्रुपमधून काढून टाकले होते. कंपनीने जानेवारी 2024 मध्ये 121 सदस्यीय एआय टीम बरखास्त केली होती. Dell Technologies ने देखील आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 10 टक्के म्हणजेच 12,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये आयटी कंपन्यांमधील टाळेबंदीमध्ये 15 टक्के वाढ झाली होती, ज्याचा ट्रेंड 2024 मध्येही कायम आहे. 


महत्वाच्या बातम्या:


हजारो कर्मचाऱ्यांना दिला नारळ, टाटा, रिलायन्ससारख्या कंपन्यांकडून नोकरकपातीचा धडाका, कारण काय?