Signature Global IPO : सिग्नेचर ग्लोबल या रिअल इस्टेट कंपनीचा आयपीओ बाजारात येणार आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी सिग्नेचर ग्लोबल त्यांचा आयपीओ जारी करणार असून त्या माध्यमातून कंपनी 730 कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. रिअल इस्टेट डेव्हलपर सिग्नेचर ग्लोबलकडून इश्यूसाठी 366-385 रुपये प्रति शेअर किंमत बॅंड निश्चित करण्यात आली आहे. आयपीओच्या पार्श्वभूमीवर कंपनीकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली. 


येत्या 20 सप्टेंबर रोजी या कंपनीचा आयपीओ बाजारात येणार असून त्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत बोली लावण्याची मुदत असेल. 


देशाच्या उत्तरेकडील भागात आणि दिल्ली-एनसीआर, गुरुग्राम भागात परवडणारी घरं देणारी कंपनी म्हणून सिग्नेचर ग्लोबलची ओळख आहे. कंपनीचा मागील काही वर्षातील ग्रोथ बघता समभागधारक मोठ्या प्रमाणात कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करतील अशी  आशा कंपनीच्या प्रमोटर्सना आहे. 


कंपनीची योजना काय आहे?


सिग्नेचर ग्लोबल या IPO च्या माध्यमातून 730 कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. यापैकी 603 कोटी रुपयांची नवीन इक्विटी जारी केली जाईल तर 127 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल पद्धतीने विकले जातील. परवडणाऱ्या आणि निम्न मध्यम विभागातील गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वात मोठी रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी असल्याचा सिग्नेचर ग्लोबलचा दावा आहे. कंपनी आयपीओमधून मिळालेल्या 432 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. याशिवाय, उर्वरित रक्कम जमीन खरेदीसाठी आणि इतर कारणांसाठी वापरली जाईल. या वर्षी जूनपर्यंत कंपनीच्या ताळेबंदात 495.26 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते. त्याच्या चार सहायक कंपन्यांवर 123.86 कोटी रुपयांचे कर्ज होते.


लीड मॅनेजर कोण आहे?


ICICI सिक्युरिटीज लिमिटेड, Axis Capital Limited आणि Kotak Mahindra Capital Company Limited हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. या आयपीओचे रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया आहेत. Enrock च्या अहवालात असे नमूद केले आहे की सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेड ही दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रा मधील 19 टक्के च्या बाजार हिस्सासह परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीने 2014 मध्ये गुरूग्राम, हरियाणा येथे 6.13 एकर जमिनीवर सोलेरा प्रकल्प सुरू करून त्याच्या उपकंपनी, सिग्नेचर बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत काम सुरू केले.


1,000 कोटी रुपयांना सेबीची मंजुरी मिळाली


सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेडने गेल्या वर्षी जुलैमध्ये शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे 1,000 कोटी रुपयांच्या IPO साठी कागदपत्रे दाखल केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच कंपनीला सेबीची मंजुरी मिळाली होती. मात्र आता आयपीओचा आकार कमी करण्यात आला आहे. या कंपनीत इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनचा 5.38 टक्के हिस्सा आहे.


ही बातमी वाचा: