LIC IPO for Policyholders: बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ उद्या खुला होणार आहे. देशातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. सामान्य गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असल्याचे एलआयसीच्या अध्यक्षांनी म्हटले होते. एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारकांना सवलतीच्या दरात आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे.  


अँकर गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद


अँकर गुंतवणूकदारांसाठी सोमवारी 2 मे रोजी आयपीओ खुला झाला होता. अँकर गुंतवणूकदारांना 5627 कोटींची गुंतवणूक केली आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार. अँकर गुंतवणूकदारांकडून 949 रुपये प्रति शेअर या दराने बोली लावण्यात आली. अँकर गुंतवणूकदारांसाठी 5,92,96,853 इक्विटी शेअर राखीव होते. 


अँकर गुंतवणुकदार म्हणजे कोण?


अँकर गुंतवणुकदार म्हणजे संस्थात्मक गुंतवणुकदार असतात. यामध्ये विविध फर्म, आर्थिक संस्थांचा समावेश होतो. अँकर गुंतवणुकदारांसाठी आयपीओ आधी खुला होतो. अँकर गुंतवणुकदारांना किमान 10 कोटी रुपये गुंतवावे लागतात. संबंधित कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर 30 दिवसांत या अँकर गुंतवणुकदारांना शेअर विक्री करता येत नाही.


एलआयसी आयपीओसाठी 4 मे ते 9 मेपर्यंत बोली लावता येणार आहे. एलआयसी कंपनी शेअर बाजारात 17 मेपर्यंत लिस्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर यामध्ये ट्रेडिंग सुरू होईल. एलआयसीच्या आयपीओत प्रति शेअर 902 रुपये ते 949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत ठरवण्यात आली आहे. आयपीओच्या एका लॉटमध्ये 15 शेअर असणार आहेत.


>> एलआयसी IPO बाबत महत्त्वाचे मुद्दे:


- एलआयसी कंपनी ही व्यावसायिक कंपनीप्रमाणे संचालक मंडळाकडून चालवण्यात येणार आहे. या संचालक मंडळात 9 संचालकांचा समावेश असून त्यांची नियुक्ती झाली आहे. एलआयसीमध्ये सध्या अध्यक्ष आहेत. वर्ष 2024 पर्यंत अध्यक्षपद राहणार असून त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. 


- एलआयसीकडे 40 लाख कोटींची मालमत्ता असून 30 लाख कोटींचा राखीव निधी आहे. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. 


- केंद्र सरकार याआधी एलआयसीमधील 5 टक्के हिस्सा विकणार होता. मात्र, बाजारातील अस्थिर परिस्थिती पाहता 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. 


- मागील आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ येणार होता. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे आयपीओ उशिराने आला. 


- एलआयसी शेअरमधील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी उत्तम असल्याचे एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांनी म्हटले.


(Disclaimer:  ही बातमी केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गुंतवणुकीसाठी आम्ही सल्ला देत नसून तुमच्या आर्थिक नुकसानीसाठी ABPLive.Com जबाबदार राहणार नाही)