Intel : कॉम्प्युटर चिप्स बनवणाऱ्या जगातील आघाडीच्या आयटी कंपनींपैकी एक असलेली इंटेल (Intel) लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, इंटेल या वर्षाच्या अखेरीस सुमारे 25,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही काळापासून इंटेल कंपनी आर्थिक अडचणींचा सामना करत असून कंपनीने घेतलेला हा निर्णय बाजारात पुन्हा स्थिरता मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

गेल्या वर्षाच्या अखेरीस इंटेलकडे एकूण 1,08,900 कर्मचारी होते, मात्र आता ही संख्या लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. 2025 च्या अखेरीस कर्मचारीसंख्या सुमारे 75,000 वर येऊन पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर, कंपनी सुमारे 25000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी, एप्रिल 2025 मध्ये इंटेलनं खर्चात कपात करण्याचे संकेत दिले होते. त्यावेळी कंपनीनं सुमारे 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना असल्याचे म्हटले होते.

दुसऱ्या तिमाहीत इंटेलला मोठा आर्थिक फटका

दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना इंटेलनं कर्मचाऱ्यांच्या कपातीची अधिकृत घोषणा केली आहे. या कालावधीत कंपनीला 2.9 अब्ज डॉलर्सचा निव्वळ तोटा झाला आहे. या तोट्यात अलीकडील कर्मचार्‍यांच्या कपातीमुळे आलेल्या पुनर्रचना खर्चाचाही समावेश आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल 12.9 अब्ज डॉलर्सवर स्थिर राहिला. चालू तिमाहीत इंटेलनं 13.6 अब्ज ते 13.6 अब्ज डॉलर्स दरम्यान महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या तिमाहीत महसूल 12.6 अब्ज डॉलर्स असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काय म्हणाले कंपनीचे सीईओ

इंटेलचे सीईओ लिप बू टॅन यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, "गेल्या काही महिने सोपे गेलेले नाहीत, हे मला माहिती आहे. कंपनीच्या प्रत्येक स्तरावर संघटनात्मक सुधारणा, कार्यक्षमता वाढवणे आणि जबाबदारी अधिक प्रभावीपणे वाटप करण्यासाठी आम्ही कठीण पण आवश्यक निर्णय घेत आहोत," असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कंपनीने आता जर्मनी आणि पोलंडमधील प्रस्तावित प्रकल्प सध्या स्थगित केले आहेत. 

ओहायोमधील चिप कारखान्याचे काम २०३० पर्यंत पूर्ण होणार

यासोबतच, अमेरिकेतील ओहायो राज्यातील नव्या प्रकल्पांचाही वेग मंदावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीचा ओहायो, अमेरिकेतील 28 अब्ज डॉलर्स (2.42 लाख कोटी रुपये) चा चिप कारखाना 2025 पर्यंत पूर्ण होणार होता. आता तो बाजारातील मागणीनुसार संथ गतीने बांधला जाईल आणि त्याचे काम 2030 नंतरच पूर्ण होईल, असे बोलले जात आहे.

आणखी वाचा 

1 ऑगस्टपासून 1 लाख कोटी रुपयांची योजना सुरु होणार, साडेतीन कोटी लोकांना नोकऱ्या मिळणार, नेमकी काय आहे योजना?