Retail Inflation To Remain High: किरकोळ महागाई दर 18 महिन्यांतील उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाई दराचा आकडा गुरुवारी 12 मे 2022 रोजी जाहीर होणार आहे. खाद्य पदार्थ, अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती, महाग झालेले इंधन दर यामुळे महागाई दर 7.50 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर हा 6.95 टक्के इतका झाला होता. एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाई दर 7.50 टक्के झाल्यास हा 18 महिन्यातील उच्चांक असणार आहे. 


एप्रिल महिन्यात मॉनिटरी पॉलिसीची घोषणा करताना रिझर्व्ह बँकेने 2022-23 मध्ये महागाई दर 5.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. 


रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 22 मार्च 2022 पासून इंधन दरात वाढ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची दरवाढ करण्यात आली. इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीचाही खर्च वाढला आहे. त्याशिवाय सीएनजी, एलपीजी गॅस दरात वाढ झाली आहे.


रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्याची घोषणा केली होती. त्याशिवाय सीआरआरमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ केली. आरबीआयच्या या निर्णयामुळे एप्रिल बँकांनी गृह व इतर कर्जांच्या व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे कर्जे महागली असून कर्जाच्या हप्त्यातही वाढ झाली आहे. 


एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर हा 7.50 टक्क्यांहून अधिक झाल्यास जून महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या होणाऱ्या बैठकीत रेपो दर वाढण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: