RBI : RBI कडून पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात महागाई दर (Inflation rate) 5 टक्क्यांच्या वर राहणार असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी दिली आहे. आरबीआयकडून सलग सहाव्यांदा रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले आहेत. आरबीआयकडून रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना व्याजदरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. 


डिसेंबर 2023 मध्ये महागाई दरात मोठी वाढ


डिसेंबर 2023 मध्ये महागाई दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर महिन्यात महागाई थेट 5.69 टक्क्यांवर गेली होती. खाद्य किंमतीत वाढ झाल्यानं महागाईत वाढ झाल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. दरम्यान, फूड प्राईजेसवर आमची नजर असणार आहे. महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती शक्तीकांत दास यांनी दिली आहे.  


पुढील वर्षात आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज


2024  या चालू वर्षामध्ये महागाई आणखी कमी होण्याची अपेक्षा असल्याचे मत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. ग्लोबल ग्रोथ स्टेडी राहण्याची शक्यता आहे. तर अनेक देशातील वाढती कर्ज हा चिंतेचा विषय असल्याचे दास म्हणाले. पुढील आर्थिक वर्षात भारताची ग्रोथ चांगली असेल. पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2024-25 मध्ये आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी व्यक्त केला. तर पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2024-25 मध्ये महागाई दर 4.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 


महागाई दर 5.4 टक्क्यांवर कायम राहणार 


यंदाच्या आर्थिक वर्षात महागाई दर 5 टक्क्यांच्या वर राहणार असल्याची माहिती शक्तीकांत दास यांनी दिली.  आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महागाई दर 5.4 टक्क्यांवर कायम राहणार आहे. भारतीय रुपया देखील यंदाच्या आर्थिक वर्षात स्थिर राहिल्याचं दिसलं आहे. दरम्यान, महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नसल्याचे दास म्हणाले.