Nirmala Sitharaman On Inflation : महागाईच्या मुद्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman) यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच सीतारमण यांच्या वक्तव्याने विरोधकांकडून टीकेची धार आणखी तीव्र होत आहे. महागाईच्या मुद्यावर (Inflation In India) निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. महागाईवर नियंत्रणात आणण्याची जबाबदारी फक्त केंद्र सरकारचीच नसल्याचे त्यांनी म्हटले. महागाई नियंत्रणासाठी राज्यांनीदेखील आपली भूमिका बजावावी असेही सीतारमण यांनी म्हटले.


अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले की, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे. महागाई कमी करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोन वेळेस कपात केली आहे. आता राज्य सरकारांनी व्हॅट करात कपात करण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. काही राज्यांमधील महागाई दर हा देशाचा महागाई दरांपेक्षाही अधिक आहे. ही बाब चिंतेची असल्याचे त्यांनी नमूद केले. या राज्यांमध्ये व्हॅट न घटवल्याने महागाईचा दर अधिक आहे. 


महागाईपासून केंद्राचा दिलासा


ICRIER मध्ये आयोजित परिसंवादात बोलताना अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्र सरकारने  महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलली असल्याचे म्हटले. जागतिकीकरणामुळे महागाईत वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महागाईवर आणखी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 


बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते की, महागाई ही सरकारसमोरील मुख्य आव्हान नाही. तर, अधिक रोजगार निर्माण करणे आणि आर्थिक समानता साध्य करणे ही सरकारची प्राथमिकता आहे. महागाई आमच्या समोरील प्राथमिक विषय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  


दरम्यान, भारतात महागाईने उच्चांक गाठला असला तरी मागील दोन महिन्यात महागाईचा दर घसरू लागला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केली आहे. एप्रिल 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 7.79 टक्क्यांवर पोहचला होता. तर, जुलै महिन्यात हा दर 6.71 टक्के इतका झाला होता. ऑगस्ट महिन्यातही महागाई दरात आणखी घट होईल असा अंदाज व्यक्त केला जाणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: