नवी दिल्ली : अमेरिकेच्या संसदेत रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत एक विधेयक माडलं होतं. ज्यामध्ये रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांवर 500 टक्के टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव होता. अमेरिकेकडून रशियासोबतचा व्यापार इतर देशांनी बंद करावा यासाठी दबाव आणला जात आहे. अमेरिकेच्या नव्या धमक्यानंतर देखील भारताकडून रशियातून मोठ्या प्रमाणात खनिज तेलाची आयात केली जात आहे. भारतानं जूनमध्ये रशियातून विक्रमी कच्च्या तेलाची आयात केली आहे. गेल्या अकरा महिन्यातील सर्वात मोठी आकडेवारी आहे. पश्चिम आशियात तणाव वाढल्यामुळं म्हणजे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्यानं रिफायनरीज कडून मोठ्या प्रमाणावर तेलाचा साठा करण्यात आला.
भारतानं रशियाकडून प्रतिदिन 2.08 मिलिनय बॅरल क्रूड तेलाची आयात जून महिन्यात केली आहे. जुलै 2024 नंतरचा हा उच्चांक आहे. Kpler या जागतिक कमोडिटी अनालिटिक्स फर्मकडून ही माहिती देण्यात आली आहे.
द सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर य यूरोपियन थिंक टँकनं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार भारताची क्रूड तेलाची आयात 6 टक्क्यांनी कमी झाली असली तरी रशियाकडून होणारी क्रूड तेलाची आयात 8 टक्क्यांनी वाढली आहे. ही जुलै 2024 नंतरची मासिक आधारवरील सर्वात मोठी वाढ आहे. भारतातील तीन रिफायनरीकडून रशियातून 50 टक्के पेक्षा जास्त आयात केली आहे. रिफायनरीत क्रूड ऑइलवर प्रक्रिया केल्यानंतर जी7 देशांना ऑइल उत्पादनांची निर्यात केली जाते.
भारताला 85 टक्के क्रूड ऑइलची आयात करावी लागते. क्रूड ऑइलची आयात केल्यानंतर रिफायनरीमध्ये त्यावर प्रक्रिया करुन पेट्रोल आणि डिझेलमध्ये तयार केलं जातं.भारत कित्येक वर्ष क्रूड तेलाची सर्वाधिक आयात मध्य आशियातील देशांकडून करायचा. आता मात्र रशियाकडून मोठ्या प्रमाणात भारत तेल खरेदी करतो. गेल्या तीन वर्षांपासून भारतानं रशियाकडून क्रूड ऑईलची खरेदी केलेली आहे.
रशिया आणि यूक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यानंतर रशियानं नव्या खेरदीदारांना सूट देण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय रिफायनरीजकडून या निर्णयाचा लाभ घेतला जात आहे. त्यामुळं रशिया भारताचा खनिज तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे.
भारतान रशियानंतर जून महिन्यात सर्वाधिक खनिज तेलाची आयात इराककडून केली आहे. भारतानं इराककडून प्रतिदिन 893000 बॅरलची आयात केली. सौदी अरेबियाकडून भारतानं 581000 बॅरल प्रतिदिन आयात केली आहे. संयुक्त अरब अमिरातकडून प्रतिदिन 490000 बॅरलची आयात केली आहे.
CREA च्या रिपोर्टनुसार चीननं रशियाकडून सर्वाधिक म्हणजे 47 टक्के क्रूड ऑइल खरेदी केलं आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो भारतानं 38 टक्के, यूरोपयिन यूनियननं 6 टक्के आणि तुर्कीकडून 6 टक्के क्रूड ऑइल खरेदी केली जाते.
दरम्यान, एस अँड पी ग्लोबल कमोडिटी इनसाईटनुसार भारत अमेरिकेकडून खरेदी करत असलेल्या क्रूड ऑइलचं प्रमाण देखील 50 टक्क्यांनी वाढलं असून 271000 बॅरल प्रतिदिन वर पोहोचलं आहे.