मुंबई: भारतात आर्थिक साक्षरता आणि सजगता वाढत असल्याचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘विमा माहिती ब्युरो’ने (IIB) जाहीर केलेल्या आर्थिक वर्ष 2021 ते 2025 च्या आकडेवारीनुसार, भारतीय नागरिक आता केवळ करबचत म्हणून नव्हे, तर दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी जीवन विम्यकडे पाहत आहेत. बदलत्या वयानुसार आणि वाढत्या जबाबदाऱ्यांनुसार ग्राहक आपल्या विमा संरक्षणाची रक्कम (Sum Assured) सातत्याने वाढवत असल्याचे समोर आले आहे.या अहवालातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

Continues below advertisement

मोठ्या रकमेच्या पॉलिसींमध्ये मोठी वाढ: 

गेल्या पाच वर्षांत ₹50 लाखांपेक्षा जास्त विमा संरक्षण असलेल्या पॉलिसींची संख्या तब्बल 68 टक्क्यांनी वाढली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये ही संख्या 44 लाख होती, जी आर्थिक वर्ष 2025 मध्ये 74 लाखांवर पोहोचली आहे. या पॉलिसींमधून कंपन्यांना ₹975 अब्जांचा वार्षिक प्रीमियम मिळाला आहे.

Continues below advertisement

कमी विम्याच्या पॉलिसी घटल्या: आर्थिक वर्ष 2021 मध्ये ₹2 लाख किंवा त्यापेक्षा कमी विमा रक्कम असलेल्या पॉलिसींचे प्रमाण 65.1 टक्के होते, जे 2025 मध्ये कमी होऊन 53.6 टक्के झाले आहे. याउलट, ₹2 ते ₹5 लाख आणि ₹10 ते ₹25 लाख विमा श्रेणींमध्ये अनुक्रमे 5.6 टक्के  आणि 2 टक्के वाढ झाली आहे.

सरासरी वार्षिक प्रीमियम वाढला: 

गेल्या पाच वर्षांत देशातील एकूण जीवन विमा पॉलिसींची संख्या 34.3 कोटींवर स्थिर राहिली असली, तरी प्रत्येक पॉलिसीमागील सरासरी वार्षिक प्रीमियम 42.6 टक्क्यांनी वाढला आहे. 2021 मधील ₹15,567 वरून हा प्रीमियम आता ₹22,195 वर पोहोचला आहे, ज्यावरून ग्राहक संरक्षणासाठी अधिक खर्च करण्यास तयार असल्याचे दिसते.

तरुणांमधील चिंतेची बाब: 

‘विमा जागरूकता समिती’ (IAC-Life) च्या अहवालानुसार, देशातील 87 टक्के लोकसंख्या अजूनही पुरेशा विमा संरक्षणापासून वंचित आहे. विशेषतः 18 ते 35 वयोगटातील तरुणांमध्ये हा 'प्रोटेक्शन गॅप' 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, जो त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो.

विमा जागरूकता समिती (IAC)-Life चे अध्यक्ष कमलेश राव यांनी सांगितले की, "भारतीय नागरिक आता विम्याचे महत्त्व ओळखू लागले आहेत. लहान वयातच विम्याची सुरुवात केल्यास कमी प्रीमियममध्ये मोठे संरक्षण मिळते आणि भविष्यातील आकांक्षा व जबाबदाऱ्यांनुसार हे संरक्षण टप्प्याटप्प्याने वाढवता येते."कोविड-१९ महामारीनंतर नागरिकांनी आपल्या आर्थिक सज्जतेचा पुन्हा आढावा घेतला असून वाढते उत्पन्न, महागाई आणि जीवनशैलीतील बदलांमुळे मोठ्या विमा संरक्षणाची मागणी वाढली आहे.