Devdutt Padikkal Century Ind vs Sl 1st Test : श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेल्या देवदत्त पडिक्कलने मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलं. तब्बल 21 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या पडिक्कलने कारकिर्दीतील पहिलं कसोटी शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारताचा नंबर-3 फलंदाज म्हणून मैदानात उतरलेल्या पडिक्कलने संयमी सुरुवात करत नंतर आपल्या फटकेबाजीला धार दिली. त्याने 147 चेंडूंचा सामना करत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 107 धावा केल्या. त्यामुळे भारताने दिवसअखेर 63 षटकांत 2 विकेट गमावत 239 धावा केल्या आहेत. पावसामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला असून पडिक्कलसोबत ऋषभ पंत 3 धावांवर नाबाद आहे.

Continues below advertisement

695 दिवसांचा शतकी दुष्काळ संपला

पडिक्कलच्या शतकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या नंबर-3 क्रमांकावरील फलंदाजाचा तब्बल 695 दिवसांचा शतकी दुष्काळ त्याने संपवला. यापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये शुभमन गिलने चेन्नईत बांगलादेशविरुद्ध नंबर-3वर खेळताना शतक झळकावलं होतं. गिलने त्या सामन्यात नाबाद 119 धावांची शानदार खेळी केली होती. त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

Continues below advertisement

गिलच्या त्या शतकानंतर भारताने नंबर-3च्या स्थानावर तब्बल सात वेगवेगळ्या फलंदाजांना संधी दिली. या कालावधीत भारताने 19 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये नंबर-3च्या फलंदाजांनी एकूण 35 डावांत फलंदाजी केली. मात्र, या सर्व फलंदाजांची सरासरी केवळ 27.28 राहिली. या काळात नंबर-3वरून केवळ पाच वेळा 50 पेक्षा मोठी धावसंख्या नोंदवता आली.

पडिक्कलचा फक्त तिसरा कसोटी सामना

देवदत्त पडिक्कलसाठी हे शतक विशेष आहे, कारण हा त्याचा कारकिर्दीतील केवळ तिसरा कसोटी सामना आहे. यापूर्वी त्याने दोन कसोटी सामन्यांतील तीन डावांमध्ये 90 धावा केल्या होत्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 65 होती. पडिक्कलने मार्च 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध धर्मशाला येथे कसोटी पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने 65 धावांची दमदार खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली. पर्थ कसोटीत शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यामुळे पडिक्कलला संघात स्थान मिळालं होतं. मात्र, त्यानंतर त्याला सातत्याने संघात स्थान मिळालं नाही. आता तब्बल 21 महिन्यांनंतर पुनरागमन करताना त्याने थेट शतक झळकावत आपली क्षमता सिद्ध केली आहे.

राहुलची झुंजार खेळी, पण क्रॅम्पमुळे मैदान सोडलं

भारताच्या डावात केएल राहुलनेही महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 77 धावांची शानदार खेळी करत पडिक्कलसोबत मोठी भागीदारी रचली.  मात्र, शतकाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच राहुलला क्रॅम्पचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं आणि तो रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. राहुलच्या रिटायर्ड हर्टनंतर पडिक्कलने मात्र डावाची जबाबदारी कायम ठेवत शतक पूर्ण केलं.

हे ही वाचा -

KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?