India vs Bharat Row: सध्या देशभरात इंडिया विरुद्ध भारत (India vs Bharat) या मुद्द्यानं जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जी20 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरील नेमप्लेटवर 'भारत' असं लिहिण्यात आलं होतं. तेव्हापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एका मोठ्या कंपनीच्या घोषणेमुळे पुन्हा एकदा इंडिया विरुद्ध भारत या मुद्याची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील बड्या लॉजिस्टिक कंपन्यांपैकी एक असलेली लॉजिस्टिक कंपनी 'ब्लू डार्ट'नं (Blue Dart) थेट आपलं नावच बदलणार असल्याची घोषणा केली आहे. 'ब्लू डार्ट'नं आपलं नाव बदलून आता 'भारत डार्ट' (Bharat Dart) केला आहे. 


महत्त्वाची बाब म्हणजे, कंपनीनं आपली प्रीमियम सेवा 'डार्ट प्लस'चं नाव बदलून 'भारत डार्ट' केलं आहे. दरम्यान, कंपनीनं केवळ त्यांच्या प्रीमियम सेवेचं नाव बदललं आहे. आता ही सेवा 'भारत डार्ट' या नावानं ओळखली जाणार आहे. कंपनीनं घोषणा केल्यापासूनच सोशल मीडियावर याबाबत मोठ्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय भारत विरुद्ध भारत वादाशी जोडला जात आहे.


नाव बदलण्याच्या निर्णयाबाबत सांगताना कंपनीनं भारताप्रती आपली वचनबद्धता व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. कंपनीनं सांगितलं की, आम्ही भारताला संपूर्ण जगाशी आणि जगाला भारताशी जोडतो. त्यामुळे हे पाऊल नक्कीच मैलाचा दगड ठरेल, अशी आशा कंपनीनं व्यक्त केली आहे. ब्लू डार्टचा हा निर्णय भारत विरुद्ध इंडिया वादाशी जोडला जात आहे. ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेडनं त्यांच्या सर्व शेअर होल्डर्सना हा बदल स्वीकारण्याचं आवाहनही केलं आहे. नाव बदलण्याच्या या निर्णयाची माहिती कंपनीनं शेअर बाजारालाही दिली आहे.


दरम्यान, G20 परिषदेवेळी राष्ट्रपतींनी 9 सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे आयोजित केलेल्या डिनरचं आमंत्रण 'द प्रेसिडेंट ऑफ भारत'च्या नावानं पाठवण्यात आलं होतं. निमंत्रण पत्रिकेवर 'भारत' हा शब्द छापल्यानंतर इंडिया विरुद्ध भारत या वादाला तोंड फुटलं. जी-20 परिषदेतही 'भारत' या शब्दाला सर्वत्र प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं होतं. अगदी मोदींसमोर ठेवलेल्या नेमप्लेटवरही 'भारत' असंच लिहिलं होतं. याच मुदद्यावरुन विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. 


संसदेच्या विशेष अधिवेशनातही 'भारत'वर चर्चेची शक्यता 


G-20 मध्ये इंडिया ऐवजी भारत असं नाव वापरण्यात आल्यानं देशभरात इंडिया विरुद्ध भारत हा मुद्दा चर्चेत आला. आता याच मुद्द्यावरुन संसदेच्या विशेष अधिवेशनातही गदारोळ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. तेव्हापासूनच, केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये इंडियाऐवजी भारत हे नाव वापरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच, संसदेतही इंडिया हे नाव कायमस्वरूपी बदलून 'भारत' असं केलं जाणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे.