Inflation Rate:  सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या महागाईबाबत मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च महिन्यातील किरकोळ महागाई दर (Retail Inflation) 6 टक्क्यांच्या खाली आहे. मार्च महिन्यात महागाई दर हा 5.66 टक्के (March Inflation Rate) इतका नोंदवण्यात आला आहे. भारतातील किरकोळ महागाई दर 15 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षातील महागाई कधी कमी होणार याची प्रतीक्षा सामान्यांना लागली आहे. 


मार्च महिन्यातील महागाई दराचे आकडे आज जारी करण्यात आले. मार्च महिन्यातील किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांखाली नोंदवण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 6.44 टक्के इतका होता. मार्च महिन्यात महागाई दर 5.66 टक्के इतका नोंदवण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाईसाठीची मर्यादा 6 टक्के इतकी ठेवली होती. आता महागाई दर 6 टक्क्यांच्या खाली आल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 


धान्य आणि दुधाच्या महागाईने चिंता 


मार्चमध्ये अन्नधान्य आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचा महागाई दर 15.27 टक्के होता. फेब्रुवारीच्या तुलनेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या महागाई दरात किंचित घट झाली आहे. दुधाची महागाई फेब्रुवारीमध्ये 9.65 टक्क्यांवरून 9.31 टक्क्यांवर आली आहे. परंतु मसाल्यांच्या महागाईचा दर 18.21 टक्के, डाळींचा महागाई दर 4.33 टक्के, फळांचा महागाई दर 7.55 टक्के राहिला आहे. 


कर्ज स्वस्त होणार?


जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दरात घट दिसून आली होती. त्यानंतर आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवत सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आला होता. महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात आली होती. त्याच्या परिणामी कर्ज आणि कर्जाचे हप्ते महाग झाले होते. 


आरबीआयने सध्याच्या आर्थिक वर्षात महागाई दर 5.20 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर हा आरबीआयच्या टॉलेरन्स बॅण्डखाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यात महागड्या कर्ज दरात दिलासा मिळू शकतो. आरबीआयची मागील पतधोरण आढावा बैठक 6 एप्रिल रोजी झाली होती.