मुंबई : अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ वॉर नुकतंच शांत झालं आहे. अमेरिकेनं चीनवर 245 टक्के तर चीननं अमेरिकेवर 125 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर चीननं अमेरिकेसोबत काही अटींवर चर्चेची तयारी दर्शवली होती. आता भारताकडून येत्या काही दिवसांमध्ये चीनला धक्का दिला जाऊ शकतो. भारतात विदेशातून येणाऱ्या स्टीलवर आयात शुल्क लादलं गेल्यानं ते महाग पडू शकतं. वृत्तसंस्था रॉयटर्सला एका सरकारी सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या स्टीलवर 12 टक्के आयात शुल्क टेम्पररी टॅरिफ सेफगार्ड ड्युटी लावली जाऊ शकते. चीन किंवा जगातील इतर देशातून कमी किमतीवर स्टील आयात वाढू नये म्हणून 12 टक्के टॅरिफ लादलं जाऊ शकतं. कारण, भारत जगातील कच्चा स्टीलची निर्मिती करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. 

आर्थिक वर्ष 2024-25  या आर्थिक वर्षात आणि त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात स्टीलच्या निर्यातीपेक्षा आयात अधिक झाली आहे. सरकारच्या प्रोव्हिजनल डेटानुसार स्टीलची आयात 95 लाख मेट्रिक टनपर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेड प्रॅक्टिसेसनं स्वस्त आयातीला रोखण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून 12 टक्के टॅरिफ लादण्याची शिफारस केली होती. ही शिफारस 200 दिवसांसाठी लागू करण्यासंदर्भात होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आलेल्या चौकशीनंतर हे समोर आलं होतं की स्वस्त आणि निर्बंधाशिवाय होत असलेल्या आयातीनं देशांतर्गत स्टील उद्योगाला नुकसान सहन करावं लागलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार आता 12 टक्के आयात शुल्क लादलं जाऊ शकतं. लवकरच या वर निर्णय गेतला जाऊ शकतो. मात्र, या संदर्भातील अंतिम निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून घेतला जाईल. 

 आर्थिक वर्ष 2024-25  च्या सुरुवातीच्या  10 महिन्यात भारतानं फिनिश्ड स्टीलची आयात चीन, दक्षिण कोरिया आणि जपान या देशातून केली होती. ही आयात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. या तीन देशातून होणाऱ्या फिनिश्ड स्टीलचं प्रमाण 78 टक्के आहे. जर, स्वस्त स्टीलची आयात वाढली तर देशातील छोट्या स्टील कारखान्यांकडून त्यांचा व्यवसाय कमी केला जाऊ शकतो. कामगारांची कपात देखील होऊ शकते.त्यामुळं स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आणि आर्सेलर मित्तल निप्पन स्टील इंडिया या सह जेएसडब्ल्यू, टाटा स्टील सारख्या मोठ्या कंपन्यांनी आयातीवर चिंता व्यक्त करत निर्बंध लावण्याची मागणी केली होती. 

इतर बातम्या :