India Gold Demand: भारतात (India) सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. या काळात सोन्याची प्रचंड खरेदी होत आहे. एका बाजुला सोन्याचे दर (Gold Rate) वाढत असताना दुसऱ्या बाजुला मागणीत देखील वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आजच जागतिक सुवर्ण परिषद (WGC) ने 2024 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी सोन्याच्या मागणीचा ट्रेंड अहवाल सादर केला आहे. या वर्षी जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी 18 टक्क्यांनी वाढून 248.3 टन झाली आहे.
जागतिक सोन्याच्या मागणीतही मोठी वाढ
सोन्याच्या आयात शुल्कात कपात केल्यामुळे दागिन्यांच्या मागणीत सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत सोन्याची एकूण मागणी 210.2 टन होती. जुलै ते सप्टेंबर 2024 मध्ये जागतिक सोन्याची मागणी पाच टक्क्यांनी वाढून 1313 टन झाली आहे. जी कोणत्याही तिसऱ्या तिमाहीतील सर्वोच्च पातळी आहे. WGC च्या 2024 च्या तिसऱ्या तिमाहीतील सोन्याची मागणी ट्रेंड अहवालानुसार, एका वर्षापूर्वी याच कालावधीत जागतिक मागणी 1249.6 टन होती.
सोन्याचे भाव आतापर्यंतच्या उच्चांकावर
अहवालानुसार, सोन्याचा किंमती सर्वकालीन उच्चांकावर आहेत, त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये किंमती कमी होण्याची वाट पाहण्याचा कल वाढू शकतो. वर्षभरात सोन्याची मागणी 700 ते 750 टन राहण्याची शक्यता आहे. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडी कमी आहे. धनत्रयोदशी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या एकूण मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये भारताची सोन्याची मागणी 761 टन होती.ज्वेलर्स आणि किरकोळ दुकानदारांकडून धनत्रयोदशीच्या मागणीमुळे, राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 300 रुपयांनी वाढून 81,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. मूल्याच्या दृष्टीने, या कॅलेंडर वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी 53 टक्क्यांनी वाढून 1,65,380 कोटी रुपये झाली, तर 2023 च्या याच कालावधीत ती 1,07,700 कोटी रुपये होती.
सोन्याच्या मागणीत 18 टक्क्यांची वाढ
2024 च्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) भारताची सोन्याची मागणी 248.3 टन होती, जी वार्षिक आधारावर 18 टक्क्यांनी वाढली आहे. जुलैमध्ये सोन्याच्या आयात शुल्कात मोठी कपात केल्यामुळे दागिन्यांच्या मागणीत सुधारणा झाली. 2015 नंतर सोन्यासाठी ही सर्वात मजबूत तिसरी तिमाही होती. 2023 च्या तिसऱ्या तिमाहीतील 155.7 टनांच्या तुलनेत मागणी 10 टक्क्यांनी वाढून 171.06 टन झाली आहे. सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. कारण सोन्यामध्ये गुंतवणूक केल्याचा भविष्यात मोठा फायदा मिळू शकतो. दरम्यान, वाढत्या दरामुळं सर्वसामान्य लोकांना मात्र, सोन्याची खरेदी करणं शक्य होत नाही.