मुंबई : सध्या शेअर बाजारात (Share Market) चांगलीच तेजी आहे. याच तेजीचा फायदा घेऊन अनेक गुंतवणूकदार भरपूर पैसे कमवत आहेत. या तेजीमुळे अनेक कंपन्यांच्या भांडवलामध्ये वाढ होताना दिसतेय. दुसरीकडे बाजाराची स्थिती पाहता अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठीची प्रक्रिया म्हणून या कंपन्या आपला आयपीओ घेऊन येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. आता लवकरच भारताची पहिली युनिकॉर्न कंपनीदेखील आपला आयपीओ घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तयारी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
तीन वर्षांपूर्वी आयपीओ आणण्याचा प्रयत्न
इनमोबी ही भारताची पहिली युनिकॉर्न कंपनी आहे. साधारण एका दशकापूर्वीच या कंपनीने हा बहुमान मिळवला होता. ही एक टेक कंपनी आहे. तीन वर्षांपूर्वी या कंपनीने आपला आयपीओ आणण्याची तयारी केली होती. मात्र नंतर कंपनीला हा विचार थांबवावा लागला. पण आता पुन्हा एकदा भारताच्या भांडवली बाजारात उतरण्याचा प्रयत्न या कंपनीकडून केला जात आहे. तीन वर्षांपूर्वी या कंपनीने अमेरिकी शेअर बाजारात उतरण्याचे ठरवले होते. त्यासाठी तयारीही करण्यात आली होती. पण काही कारणास्तव या योजनेला अंतिम स्वरुप आले नव्हते. ईटीच्या रिपोर्टनुसार आता इनमोबी ही कंपनी भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यासाठी तयारी करत आहे. त्यासाठीची पहिली प्रक्रिया म्हणून लवकरच ही कंपनी आयपीओ घेऊन येणार आहे.
2011 साली कंपनी युनिकॉर्न
इनमोबी ही कंपनी ॲडटेक स्टार्टअप आहे. या कंपनीला 2011 सालीच युनिकॉर्न कंपनीचा दर्जा मिळाला होता. जी कंपनी आपला व्यापार वाढवून स्वत:चे भांडवल 1 अब्ज डॉलर्सपर्यंत घेऊन गेलेली आहे, अशा कंपनीला युनिकॉर्न कंपनी म्हटले जाते. भाराताची ही पहिली कंपनी आहे, जिला युनिकॉर्न कंपनीचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर आता अनेक कंपन्याना हा बहुमान मिळालेला आहे.
कंपनीचा अनेक देशांत विस्तार
ही कंपनी मोबाईल ॲड सर्व्हिसेस वर काम करते. या कंपनीचा व्यापार अनेक देशांत पसरलेला आहे. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांत या कंपनीचा व्यापार आहे. ही कंपनी ॲड तयार करते, संकेतस्थळावर येणाऱ्या ट्रॅफिकला मॉनिटाईज करणे, ॲड कॅम्पेनची कामगिरी कशी आहे, त्यावर नजर ठेवणे, रियल टाईम रिपोर्ट्स तयार करणे अशी वेगवेगळी कामे या कंपनीकडून केली जातात.
आयपीओ नेमका कधी येणार?
दरम्यान, इनमोबी कंपनीच्या प्रस्तावित आयपीओबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. हा आयपीओ नेमका कसा असेल? कंपनी या आयपीओतून किती रुपये उभे करणार आहे? तो नेमका कधी येईल? या आयपीओचा किंमत पट्टा काय असेल? याबाबत सध्यातरी अस्पष्टता आहे. बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट दिल्यानंतरच या आयपीओबाबत सविस्तर माहिती समजू शकणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
सध्या शेअर बाजारात तुफान तेजी, पण 'हे' म्युच्यूअल फंड अजूनही तोट्यात, जाणून घ्या सविस्तर!