India vs China News : रशियाकडून (Russia) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) खरेदीच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. त्यामुळं भारत आता रशियन तेलाचा सर्वात मोठा आयातदार बनला आहे. जुलै महिन्यात भारताने  (India) आयात केलेल्या कच्च्या तेलात रशियन कच्च्या तेलाचा वाटा 44 टक्के होता. चीनच्या रिफायनरी कंपन्यांनी नफ्याचे प्रमाण कमी केल्यामुळं रशियाकडून कमी कच्चे तेल आयात केले आहे.


किती होते तेलाची आयात?


रॉयटर्सच्या अहवालानुसार, जुलै 2024 मध्ये भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलात रशियन कच्च्या तेलाचा वाटा विक्रमी 44 टक्के होता. भारताने दररोज 2.07 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची आयात केली आहे. जी जून 2024 च्या तुलनेत 4.2 टक्के अधिक आहे आणि एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 12 टक्के अधिक आहे. चीनने पाइपलाइन आणि शिपमेंटद्वारे रशियाकडून दररोज 1.76 दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात केले आहे.


भारतीय रिफायनरी कंपन्यांनी रशियातून कच्च्या तेलाची स्वस्त दरात आयात


फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर, पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते. त्याचे तेल आणि वायू खरेदीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली आणि देशांतर्गत रिफायनरी कंपन्यांना त्याचा मोठा फायदा झाला. युद्ध सुरू झाल्यापासून भारताचा रशियासोबतचा व्यापार वाढला आहे. भारतीय रिफायनरी कंपन्यांनी रशियातून कच्च्या तेलाची स्वस्त दरात आयात केली, त्याचे शुद्धीकरण करून पेट्रोल डिझेल जागतिक बाजारपेठेत विकले, त्यातून प्रचंड नफा कमावला. यामुळे जगभरातील पेट्रोलियम पदार्थांच्या महागाईला आळा बसण्यास मदत झाली आहे.


भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा इराक हा दुसरा सर्वात मोठा देश


रशियानंतर, भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा इराक हा दुसरा सर्वात मोठा देश आहे. त्यानंतर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा क्रमांक लागतो. जुलै महिन्यात मध्यपूर्वेतील देशांकडून भारताच्या कच्च्या तेलाच्या खरेदीत 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची आयात करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही घसरत आहेत. दरम्यान, सर्वांना एकच प्रश्न पडला असेल की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार की घट होणार? मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या काळात दरात घसरण होण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! भारत प्रथमच 'या' 4 देशांमध्ये साठवणार कच्चे तेल, आणीबाणीच्या स्थितीत साठे तयार करण्याचा निर्णय