नवी दिल्ली : आयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरण्याची अंतिम मुदत ही 30 सप्टेंबर असून त्या आधी करदात्यांनी आपला आयकर भरावा असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या आधी असलेली 31 जुलै ही मुदत वाढवून ती 30 सप्टेंबर केली होती. करदात्यांना दिलासा मिळावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली होती.
आर्थिक वर्ष 2020-2021 यासाठी आयकर भरायची मुदत ही आता या महिन्याच्या 30 सप्टेंबरपर्यंत आहे. करदात्यांनी ही अंतिम मुदत पाळली नाही तर त्यानंतर 5000 रुपये अतिरिक्त दंड भरावा लागणार आहे. जर आपले वार्षिक उत्पन्न हे पाच लाखांच्या आत आहे आणि आपण अंतिम मुदत पाळली नाही तर आपल्याला 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.
आयकर विभागाने आपले नवीन ई-फाईलिंग पोर्टल सुरु केलं असून करदात्यांनी www.incometax.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपला आयटीआर भरावा. नवीन ई-फाईलिंग पोर्टलचा उद्देश करदात्यांना सुलभ आणि गतिमान सुविधा पुरवणे हा आहे.
आधार-पॅन लिंक करण्याची मुदत
केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली असून तीही 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. त्या आधी सर्वांनी आपले आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. जर आपण शासनाने दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण आपला आधार पॅनशी लिंक केले नाही तर यासाठी आपल्याला एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.
एखाद्या व्यक्तीने 30 सप्टेंबरपर्यंत आपला पॅन कार्ड हे आधारशी जोडलं नाही तर त्यांचं पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करू शकणार नाही.
संबंधित बातम्या :