PAN Card : पॅन कार्ड हे सध्याच्या काळातील सर्वात महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज समजले जाते. मालमत्ता खरेदी करणे, बँक खाते उघडणे, गुंतवणूक करणे, दागिने खरेदी करणे इत्यादी जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड वापरले जाते. 


1 एप्रिल 2022 पासून पॅनकार्डबाबतच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला नंतर मोठा दंड भरावा लागणार आहे. यासोबतच तुमचं पॅन कार्डही निष्क्रिय (Pan Card Inactive) केले जाणार आहे. परंतु, अनेक वेळा पॅन कार्ड आधारशी लिंक केल्यानंतरही ते लिंक होत नाही आणि त्याची कल्पनाही अनेकांना नसते. त्यामुळे आता पॅनकार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. 


अशा परिस्थितीत आजच पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक झाले आहे की नाही हे तपासून घ्या. पॅन अवैध असल्यास, तुम्ही बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकणार नाही. याशिवाय शेअर बाजारातील ट्रेंडिंगवरही बंदी घालण्यात येणार आहे. यासोबतच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आदींवरही बंदी घालण्यात येणार आहे. पॅनकार्डशिवाय तुम्ही आयकर रिटर्न भरू शकणार नाही. 


>> पॅन आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही, हे कसे पाहणार?


> पॅन कार्ड आधारशी लिंक केल्याची स्थिती तपासण्यासाठी,  आयकर विभागाचे संकेतस्थळ  incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्या.
> यानंतर तुम्हाला Know Your Pan या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
> यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यावर तुम्हाला तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, नोंदणीकृत असलेला मोबाईल क्रमांक आदी माहिती नमूद करावी लागणार आहे. 
> ही माहिती नमूद केल्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करा.
>  त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल, तो यामध्ये नमूद करा
> यानंतर तुमचा पॅन क्रमांक, नाव आदी माहिती समोर येईल. 
> या माहितीत तुमचे पॅन कार्ड सक्रिय आहे की नाही ते तपासता येईल. 


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha