PM Kisan Samman Nidhi Yojana: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय घेतला आहे. त्यांनी पीएम शेतकरी सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर आता या योजनेचा 17 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडणार आहे. शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात या दोन हजार रुपयांची मदत होणार आहे. दरम्यान, आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असली तरी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे, अर्ज दाखल करताना त्रुटी राहिल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात. याच पार्श्वभूमीवर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार की नाही? हे कसे तपासायचे हे जाणून घेऊ या...


आतापर्यंत 16 हफ्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत 


देशभरातील शेकडो शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ होत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. प्रत्येक तीन महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना हे सहा हजार रुपये दिले जातात. भारत सरकारने आतापर्यंत या मदतीचे एकूण 16 हफ्त्यांच्या रुपात शेतकऱ्यांना मदत केली होती. आता नुकतेच मोदी यांनी सतराव्या हफ्त्यासाठीचा निधी मंजूर केला आहे.


तुम्ही लाभार्थी आहात की नाही हे कसे शोधायचे?


तुमच्या खात्यात पीएम शेतकरी सन्मान निधीचे पैसे येणार की नाही? तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार की नाही, हे तुम्ही स्वत: तपासून पाहू शकता. तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वांत अगोदर तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. 


कॅप्चा कोड, रजिस्ट्रेशन नंबर टाका


त्यानंतर तुम्हाला Know Your Status या पर्यायाला निवडावे लागेल. त्यानंतर स्क्रीनवर आणखी एक पेज उघडले जाईल. त्या पेजवर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. त्यानंतर स्क्रीनवर असलेला कॅप्चा कोडही तुम्हाला टाकावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ओटीपी मिळवण्यासाठी क्लीक करावे लागेल.


तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंत तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल. तुम्हाला पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा मिळेल की नाही, तुम्ही 17 व्या हफ्त्याचे लाभार्थी ठरणार की नाही, ही सर्व माहिती दुम्हाला स्क्रीनवर दिसेल. 


हेही वाचा :


 नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून किती पगार मिळणार? अन्य देशांतील नेतृत्त्वाला किती मानधन मिळते? वाचा सविस्तर...


नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी! पीएम किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याला मंजुरी; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये!


बापरे बाप! 1000 रुपयांचे झाले तब्बल 1.40 कोटी, 'या' कंपनीने अनेकांना केलं मालामाल