Why CNG PNG Price Cut :  मुंबई आणि जवळपासच्या परिसरात 8 एप्रिलपासून सीएनजी, पीएनजीच्या दरात कपात (CNG PNG Gas Price Cut) करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने घेतला आहे. सीएनजी-पीएनजीचे दर निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्या आहेत. त्यानुसार आता, सीएनजी-पीएनजीच्या दरात 10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. 


घरगुती गॅसच्या किंमतींना आता आंतरराष्ट्रीय हब गॅसच्या ऐवजी इंपोर्टेड क्रूडसोबत जोडण्यात आली आहे. आता, घरगुती गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केट दराच्या 10 टक्के इतका असणार आहे.


इतकंच नव्हे तर सीएनजी आणि पीएनजीचे दर आता प्रत्येक महिन्याला निश्चित करण्यात येणार आहे. याआधी दर सहा महिन्याला दर निश्चित केले जात असे. 


काय आहे सरकारचा निर्णय?


आतापर्यंत, घरगुती गॅसच्या किंमतींसाठी ऑक्टोबर 2014 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली होती. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या आधारे देशांतर्गत बाजारातील किमती निश्चित करण्यात आल्या.


आता सरकारने ही मार्गदर्शक तत्त्वे बदलली आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये सरकारने किरीट पारेख यांच्या अध्यक्षतेखाली घरगुती गॅसच्या किमती निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीच्या सूचनेनुसार सरकारने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे.


आता घरगुती गॅसची किंमत आंतरराष्ट्रीय हब गॅसऐवजी आयातित क्रूडशी जोडली गेली आहे आणि आता घरगुती गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या 10 टक्के असेल. समजा भारतीय क्रूड बास्केटची किंमत 85 डॉलर असेल, तर भारतातील घरगुती गॅसची किंमत $8.5 असेल, म्हणजे त्याच्या 10%. ही किंमत आता 6 महिन्यांऐवजी दर महिन्याला निश्चित केली जाणार आहे.


घरगुती गॅसची किमान आणि कमाल किंमतही निश्चित होणार आहे. आता दोन वर्षांसाठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही मर्यादा दोन वर्षांनी वाढवण्यात येणार आहे.


याचा फायदा काय?


1 नोव्हेंबर 2014 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, घरगुती गॅसच्या किमती दर 6 महिन्यांनी निश्चित करण्यात येत होत्या.


त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती मध्येच वाढल्या तर गॅस कंपन्यांना तोटा सहन करावा लागत असे आणि गॅसचे दर कमी झाले तर सर्वसामान्यांचे नुकसान होत होते.


मात्र आता जे दोन मोठे बदल झाले आहेत, त्याचा फायदा गॅस कंपन्या आणि सर्वसामान्यांना होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गॅस हबऐवजी भारतीय क्रूड बास्केटवर किंमती निश्चित केल्या जातील.


- दुसरे म्हणजे कमाल आणि किमान दोन्हीची किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे किंमत खूप कमी झाली तरी कंपन्यांचे नुकसान होणार नाही आणि खूप वाढले तरी जनतेचे नुकसान होणार नाही.


आंतरराष्ट्रीय गॅस हबऐवजी आता क्रूड बास्केट का?


आतापर्यंत घरगुती गॅसच्या किमती जगातील चार प्रमुख गॅस ट्रेडिंग केंद्रांद्वारे ठरवल्या जात होत्या. हे हब हेन्री हब, नॅशनल बॅलन्सिंग पॉइंट (यूके) आणि रशिया आहेत.


या चार गॅस ट्रेडिंग हबच्या गेल्या एक वर्षाच्या किमतीची सरासरी घेतली गेली आणि नंतर ती तीन महिन्यांच्या अंतराने लागू केली गेली.


आंतरराष्ट्रीय बाजारात किमती झपाट्याने चढ-उतार होत असत आणि त्याचा परिणाम गॅसच्या किमतीवर होत असे. मात्र आता देशांतर्गत गॅसची किंमत भारताकडून परदेशातून आयात होणाऱ्या गॅसच्या किमतीच्या आधारे निश्चित केली जाणार आहे.


किमान आणि कमाल सीलिंग प्राइस काय असणार?


सध्या भारतीय क्रूड बास्केटची किंमत प्रति बॅरल 85 डॉलर आहे. यातील 10 टक्के प्रति बॅरल 8.5 डॉलर झाले. पण सरकारने त्याची कमाल किंमत 6.5 डॉलर ठेवली आहे.