मुंबई : घर घेण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. कारण घर पुन्हा एकदा महाग झालं आहे. या वर्षी जानेवारी-सप्टेंबर या कालावधीत देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये, निविष्ठा खर्च आणि मागणीतील वाढ झाल्यामुळे घरांच्या किमती सुमारे 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनी प्रॉपटायगरच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.


या वर्षी सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस आठ शहरांच्या प्राथमिक बाजारपेठांमध्ये निवासी मालमत्तांची भारित सरासरी किंमत 6,600-6,800 रुपये प्रति चौरस फूट झाली आहे. हिच किंमत 2021 च्या डिसेंबर तिमाहीच्या शेवटी प्रति चौरस फूट 6,300-6,500 रुपये होती. ब्रोकरेज कंपनीने आपल्या निवेदनात ही आकडेवारी दिली आहे.


सिमेंट आणि स्टीलच्या किमतीत वाढ


पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना PropTiger.com, Housing.com आणि Makaan.com चे CFO विकास वाधवन यांनी काही प्रमुख बाबींवर प्रकाश टाकला आहे. प्राथमिक घरांच्या बाजारातील किमतींमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. ही वाढ सिमेंट आणि स्टीलसारख्या प्रमुख कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झाली आहे असं वाधवान यांचं म्हणणे आहे.


मे महिन्यापासून गृहकर्जावरील व्याजदरात सुमारे 2 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी, मागणीच्या जोरावर येत्या तिमाहीत घरांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रमुख बांधकाम साहित्याच्या किमती कमी झाल्या असल्या तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे.


पुण्यातील घरांची विक्री 7 टक्क्यांनी वाढली


महाराष्ट्रातील प्रमुख 2 बाजारपेठां मुंबई आणि पुणे या आहे.  इथे डिसेंबर 2021 च्या तुलनेत जुलै-सप्टेंबर 2022 या कालावधीत किमती अनुक्रमे 3 आणि 7 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि 9,900-10,100 रुपये आणि 5,500-5,700 रुपये प्रति चौरस फुटापर्यंत या किंमती पोहोचल्या आहेत.


अहमदाबादच्या किंमती 3,600-3,800 प्रति चौरस फूट 


गुजरातच्या अहमदाबादमधील घरांच्या किमती जुलै-सप्टेंबर या कालावधीत 5 टक्क्यांनी वाढून 3,600-3,800 रुपये प्रति चौरस फूट झाल्या आहेत अशी माहिती अहवालातून मिळाली आहे. 2021 कॅलेंडर वर्षाच्या शेवटी याच किमती 3,400-3,600 रुपये प्रति चौरस फूट होत्या. या कालावधीत बेंगळुरूमधील निवासी मालमत्तेची किंमत 6 टक्क्यांनी वाढून 5,500-5,700 रुपये प्रति चौरस फूट वरून 5,900-6,100 रुपये झाली.


चेन्नईमध्ये 2 टक्क्यांची किरकोळ वाढ


चेन्नईमध्ये घरांच्या किमती किरकोळ 2 टक्क्यांनी वाढून 5,500-5,700 रुपये झाल्या आहेत, तर दिल्ली-एनसीआरमध्ये किमती 5 टक्क्यांनी वाढून 4,700-4,900 रुपये झाल्या. त्याचप्रमाणे, जुलै-सप्टेंबर दरम्यान हैदराबादमध्ये घरांच्या किमती 4 टक्क्यांनी वाढून 6,100-6,300 रुपये प्रति चौरस फूट आणि कोलकात्यात 3 टक्क्यांनी वाढून 4,400-4,600 रुपये प्रति चौरस फूट झाल्या.