House Construction Cost: जे लोक घर बांधण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे. कारण सध्या सिमेंटच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून सिमेंटच्या दरात वाढ सुरु आहे.  त्यामुळं घर बांधण्याच्या खर्चातही सातत्यानं वाढ होत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात हा दरवाढीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे.


ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये सिमेंटच्या दरात 4 टक्क्यांची वाढ 


काही महिन्यांच्या दिलासानंतर पुन्हा एकदा सिमेंटचे दर वाढू लागले आहेत. सप्टेंबर तिमाहीत सिमेंटच्या किंमतीत लक्षणीय वाढ दिसून आली होती. त्यामुळं घर बांधण्याचा खर्चही सातत्याने वाढत आहे. येत्या काही दिवसांतही हा वाढीचा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात सिमेंटच्या सरासरी किमती एक महिन्यापूर्वी म्हणजेच ऑगस्टच्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जर आपण संपूर्ण तिमाहीबद्दल बोललो तर, सप्टेंबर तिमाहीत सिमेंटचे दर हे मागील तिमाहीच्या म्हणजेच एप्रिल-जून 2023 च्या सरासरी किमतीपेक्षा 0.5 टक्के ते 1 टक्क्यांनी जास्त आहेत. 


 प्रति बॅग 50 ते 55 रुपयांची वाढ 


जेफरीज इंडियाच्या विश्लेषकांचे मत आहे की सिमेंटच्या किमतीतील ही वाढ प्रामुख्याने पूर्व भारतातील सिमेंटच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आहे. वाढलेल्या किंमतीचा बोजा सहन करण्याऐवजी आता सिमेंट कंपन्या ग्राहकांवर काही भाग टाकत आहेत. ऊर्जा खर्चामुळं सिमेंट कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सिमेंटच्या किरकोळ किमती वाढवल्या जात आहेत. जेफरीज इंडियाच्या मते, सिमेंटच्या किमती पूर्व भारतात सर्वाधिक वाढल्या आहेत.  सप्टेंबरअखेरपर्यंत सिमेंटच्या दरात प्रति बॅग 50 ते 55 रुपयांची वाढ झाली आहे. तर देशाच्या इतर भागात सिमेंटच्या किमती तुलनेने कमी वाढल्या आहेत. या काळात इतर भागांमध्ये प्रति बॅगच्या किमतीत 20 रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यवसायिकांनी दिली आहे.


काही महिन्यांपूर्वीपर्यंत सिमेंटच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. दीर्घकालीन किंमत अजूनही कमी आहे. जुलै महिन्यात सिमेंट स्वस्त झाले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून तेजीचा कल परत वाढला आहे. येत्या काही महिन्यांत तेजीचा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी निवडणुकांपूर्वी सरकारी खर्चावर भर दिल्यामुळं या क्षेत्रातील मागणीची स्थिती मजबूत आहे. सध्या तरी दर कमी होण्याची शक्यता नाही.


महत्त्वाच्या बातम्या:


डील पक्की... गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी; कितीचा झाला सौदा?