Home Loan EMI नवी दिल्ली : स्वत: चं घर खरेदी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, घरांच्या किमती प्रचंड वाढल्यानं घर खरेदी करण्यासाठी गृह कर्जाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, गृहकर्जाचा कालावधी 20 ते 30 वर्षांचा असतो. दीर्घकाळाचं गृहकर्ज मानसिक आणि आर्थिक ओझे होऊ शकते. गृहकर्जाची परतफेड करताना मुद्दलापेक्षा अधिक रक्कम व्याजामध्ये निघून जाते. मात्र, योग्य वित्तीय योजना आणि शिस्तीचं पालन केल्यास गृहकर्ज परतफेडीचा कालावधी निम्मा करता येतो आणि लाखो रुपयांचं व्याज वाचवलं जाऊ शकतं. जर तुमचं गृहकर्ज सुरु असेल तर तुम्हाला काही टिप्समुळं याचा फायदा होऊ शकतो.
दरवर्षी एक ईएमआय अधिक भरा
जर तुम्ही दरवर्षी एका ईएमआयची रक्कम प्री पेमेंट म्हणन केली तर कर्जाचा कालावधी काही वर्षांनी कमी होऊ शकतो. याच पद्धतीनं मुद्दल वेगानं कमी होतं, त्यामुळं भविष्य काळातील व्याज कमी होतं.
वार्षिक ईएमआयमध्ये वाढ करावी
तुमचा पगार वाढला किंवा उद्योगातून उत्पन्न वाढते तेव्हा तुम्ही ईएमआयची रक्कम वाढवून घ्यावी. ईएमआयमध्ये 5 ते 10 टक्के वाढ करावी. दरवर्षी ईएमआयमध्ये वाढ केल्यानं 20 वर्षाचं कर्ज 12 ते 13 वर्षात संपवू शकता.
बोनस आणि एक्स्ट्रा इन्कमचा वापर करावा
कंपनीतून मिळणारा वार्षिक बोनस आणि कर परतावा किंवा इतर गुंतवणुकीतून मिळालेल्या परताव्याच्या पैशांचा वापर अनावश्यक गोष्टींसाठी कर्च करण्याऐवजी गृहकर्जाचं प्री पेमेंट करण्यासाठी वापरावं. जेव्हा तुमच्याकडे एकाचवेळी मोठी रक्कम येईल तेव्हा ती गृहकर्जात जमा करावी.
गृहकर्ज ट्रान्सफर करणे
तुमचं गृहकर्ज ज्या बँकेत आहे आणि ज्या व्याज दरावर आहे, त्यापेक्षा दुसरी बँक कमी व्याजावर गृहकर्जाची ऑफर देत असेल तर कर्ज ट्रान्सफर करण्याचा विचार करावा. व्याज दरात 0.50 टक्क्यांची कपात झाल्यास लाखो रुपये वाचू शकतात.
फ्लोटिंग रेट लोनचा फायदा घ्या
आरबीआयच्या नियमानुसार फ्लोटिंग व्याज दर असणार्या गृहकर्जाच्या प्री प्रेमेंटसाठी दंड लागत नाही. यामुळं जेव्हा आर्थिक बचत असेल तेव्हा कोणत्याही भीतीशिवाय कर्ज खात्यात पैसे जमा करत राहावे. गृहकर्ज लवकर संपवण्यासाठी अधिक कमाई करण्याची गरज नाही, योग्य आर्थिक व्यवस्थापनाची गरज आहे. वेळोवेळी ईएमआयमध्ये थोडी थोडी वाढ केल्यास आणि योग्य वेळी प्री पेमेंट केल्यास तुम्ही लवकर कर्जातून मुक्त व्हाल, त्याशिवाय भविष्यासाठी आर्थिक बचत करु शकता.
