Bhaskar Jadhav : गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्ह यासंदर्भात सुनावणी सुरु आहे. आजही सुनावणी पार पडली. शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ( Kapil Sibal) यांनी आज देखील जोरदार युक्तीवाद केला. तसेत आज त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar) यांनी दिलेल्या निर्णयावरच आक्षेप नोंदवला आहे. राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर नार्वेकरांनी देखील कपिल सिब्बलांचे दावे बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राहुल नार्वेकरांवर जोरादर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
राहुल नार्वेकर यांना आपण विधानसभेचे अध्यक्ष आहोत याचे भान राहिलेले नाही, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. विधानसभेचा अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो. त्याची भूमिका पक्षाविरहीत असली पाहिजे, मात्र राहुल नार्वेकर सारख्या व्यक्तीकडून अशा पद्धतीची अपेक्षा करणे चूकीचं असल्याचे जाधव म्हणाले.
मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत, त्यामध्ये बदल होणार नाही : राहुल नार्वेकर
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वकील कपिल सिब्बल यांच्यावर टीका केली होती. सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहे, ते काय म्हणतात याच्यातून काही सिद्ध होत नाही असे नार्वेकर म्हणाले. मी जी भूमिका घेतली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले, त्या निकषाच्या आत राहून, त्या आधारावरतीच हा निर्णय दिला दिल्याचे नार्वेकर म्हणाले. त्यांचे जे वकिल असतील त्यांच्या संदर्भात ते युक्तिवाद करतील, याचाच अर्थ असा नाही की ते जे म्हणताय ते सत्य आहे. अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं पहिला प्रश्न हा आहे असे नार्वेकर म्हणाले. असे बिनबुडाचे आरोप करुन कोणताही फरक पडत नाही, मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय असल्याचे नार्वेकर म्हणाले. या निर्णयामध्ये कोणताही बदल होईल असं मला वाटत नाही असेही ते म्हणाले.
रस्ता कुठे आणि खड्डे कुठे हा प्रश्न पडतो : भास्कर जाधव
माझ्या मतदारसंघात दहा वर्षांपूर्वी रस्ते केले, त्याला एकही खड्डा नाही. मात्र सध्याच्या सरकारमध्ये जे रस्ते झाले त्या ठिकाणी रस्ते शोधावे लागतात असी टीका भास्कर जाधव यांनी केली. रस्ता कुठे आणि खड्डे कुठे हा प्रश्न पडतो, असे म्हणत खड्यांच्या प्रश्नावरून भास्कर जाधव यांनी टीका केली. सध्याचे मुख्यमंत्री हे आपल्या पक्षातल्या नेत्यांचे निर्णय बदलत नाहीत, मात्र दोन्ही मित्र पक्षाच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय सर्रास बदलण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री सर्रास करत असल्याचा टोला देखील भास्कर जाधवांनी लगावला. मुख्यमंत्री हे सर्व राज्याचा पालक असतात. पण ही भूमिका आणि वागणं या मुख्यमंत्र्यांकडून दिसत नाही असे म्हणत मंत्र्यांच्या निर्णय बदलावरुन भास्कर जाधव यांनी टीका केली
भरत गोगावले आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदावरुन टीका
भरत गोगावले आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदावरून जाधवांनी टीका केली आहे. कुंभमेळा मंत्री असताना गिरीश महाजन यांच्या नातेवाईकांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री केलं असावं असा टोला जाधवांनी लागवाला. तर मुंबई महामार्गावरील खड्ड्यांकडे भरत गोगावले लक्ष देणार आहेत म्हणून त्यांना पालकमंत्री पद दिलं आहे. कदाचित नाशिक पेक्षा अधिक खड्डे पाडण्यासाठी गोगावले यांना पालकमंत्री केलं असावं असा टोला देखील त्यांनी लगावला.