नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्यात विक्रमी जीएसटी संकलन (GST collection in October 2021) करण्यात आले आहे. मागील महिन्यात एक लाख 30 हजार 127 कोटी इतकी जीएसटी जमा करण्यात आला. यामध्ये सीजीएसटी 23 हजार 861, एसजीएसटी 30 हजार 421 कोटी आणि आयजीएसटी 67 हजार 361 कोटी रुपये आदीचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 24 टक्के अधिक कर जमा करण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी संकलन वर्षभरातील दुसऱ्या क्रमांकाची उच्चांकी कर संकलन आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात उच्चांकी कर संकलन करण्यात आले होते. एप्रिल महिन्यात एक लाख 40 हजार कोटी जीएसटी कर संकलन करण्यात आले होते. कोरोना महासाथीमुळे प्रभावित झालेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे हे चिन्ह असल्याचे म्हटले जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या जीएसटी कर संकलनात आयजीएसटी 67 हजार 361 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 32 हजार 998 कोटी रुपये) तर, उपकर 8684 कोटी (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेले 699 कोटी रुपये) याचाही समावेश आहे.
कोरोना महासाथीनंतर अनेक राज्यांची अर्थव्यवस्था रूळावर येत असल्याने राज्यांच्या कर संकलनात वाढ होत आहे. महाराष्ट्रात मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये अनुक्रमे 25 आणि 24 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. सर्वाधिक वाढ जम्मू-काश्मीरमध्ये नोंदवण्यात आली. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत यावर्षी 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अनेक कंपन्यांनी उत्पादनात वाढ केल्याने तसेच कच्च्या मालाची खरेदी मागणी वाढली. उत्पादन आणि खरेदी क्षमता आणखी वाढली आहे. मागील सात महिन्यात ही वाढ सर्वात वेगाने वाढली असल्याचे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. धोरणात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय प्रयत्नांमुळे वेळेवर कर विवरण पत्र दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे हे आणि पुढील महिनाअखेरपर्यंत भरलेल्या विवरणपत्राच्या टक्केवारीतील वाढ स्पष्टपणे दर्शवत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, महासाथीची ओसरती लाट, पूर्वपदावर येणारे जनजीवन यामुळे अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. त्याच्या परिणामी जीएसटी संकलनात वाढ झाली आहे.