सोने व चांदीच्या बाजारातील सध्याची स्थिती आणि भविष्यातील संभाव्य दिशा यावर कामा ज्वेलरीचे एमडी कॉलिन शहा यांनी अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरांमध्ये सौम्य चढ-उतार पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात हे दर प्रामुख्याने 3,300 ते 3,350 अमेरिकन डॉलर्स या दरम्यान राहिले, त्यामुळे बाजार स्थिर होता. यामागचं मुख्य कारण म्हणजे डॉलरकडे वाढता कल होय, ज्यामुळे बाजारावर सौम्य दबाव राहिल्याचं दिसून आलं. याचा परिणाम म्हणून भारतातील देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर  97,000 ते 99,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरम्यान राहिले.

सोने दराच्या या ट्रेंडमध्ये लवकरच फारसा बदल होण्याची शक्यता नाही, कारण ट्रम्प टॅरिफबाबतचा अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. दुसरीकडे, भारतातील सणासुदीचा हंगाम सुरु होणार असल्यामुळे सोन्याची स्थानिक मागणी वाढण्याची शक्यता आहे.

चांदीच्या बाबतीत पाहिलं, तर आंतरराष्ट्रीय बाजारातील दर 36 – 37 अमेरिकन डॉलर प्रति औंस या दरम्यान राहिले आणि आजच्या व्यापार सत्रात त्यामध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली. देशांतर्गत बाजारात चांदीचे दर 1,10,000 – 1,11,000 रुपये प्रति किलो या दरम्यान राहिले. यामागचं कारण म्हणजे जागतिक कमॉडिटी ट्रेंड्स व किंमतीतील चढउतारानंतर गुंतवणूकदारांनी सावध दृष्टिकोन स्वीकरणं होय.

पुढच्या आठवड्यात सोन्याचे दर स्थिर राहतील असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 3,300 ते 3,400 डॉलर्स प्रति औंस दरम्यान राहू शकतात. तर देशांतर्गत बाजारात हे दर 98,500 ते 99,500 रुपये प्रति 10 ग्रॅम दरम्यान राहतील. चांदीच्या बाबतीत दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.