Gold Silver Rate: सोन्या-चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. दरात 770 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा दर 75,596 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 858 रुपयांची घसरन झाली असून, प्रतिकिलो चांदीची किंमत ही 88023 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळं सोन्या-चांदीच्या भावात घसरण
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ब्रिक्स देशांवर 100 टक्के शुल्क लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जर ब्रिक्स देशांनी अमेरिकन डॉलर सोडून इतर कोणतेही चलन स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर ते या देशांकडून होणाऱ्या आयातीवर भारी शुल्क लावतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यातून भारत, रशिया, ब्राझील आणि चीनला थेट संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रिक्स देशांमध्ये डॉलर व्यतिरिक्त त्यांचे स्वतःचे चलन सुरू करण्याबाबत सतत चर्चा होत आहे. यावरुन ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. त्यामुळं आजच्या व्यवहारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा भाव 673 रुपये किंवा 0.88 टक्क्यांच्या घसरणीसह 75,701 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 0.92 टक्क्यांच्या घसरणीसह 88,062 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
ग्राहकांना सोन्याची खरेदी करण्याची मोठी संधी
सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळं ग्राहकांना सोने चांदी खरेदीची मोठी संधी मिळाली आहे. योग्य वेळी सोन्याच्या किमतीत घट दिसून येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचे भाव कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 6 टक्के आणि देशांतर्गत बाजारात 3.7 टक्के घसरण झाली आहे, जे विशेषतः दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी खरेदीची संधी देत आहे. सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. या लग्नसोहळ्यांमध्ये सोन्याची खरेदी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे कारण त्यामुळे अमेरिकन फेड व्याजदर कमी करण्याची शक्यता कमी होत आहे.
कमी व्याजदराच्या काळात सोन्याच्या किमती वाढतात
कमी व्याजदराच्या काळात सोन्याच्या किमती वाढतात, परंतु व्याजदर कपातीची अपेक्षा कमी होत आहे आणि अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे सोन्याचे भाव कमी झाले आहेत. वाढत्या अमेरिकन डॉलरमुळे सोने खरेदी करणे महाग झाले आहे. त्यामुळं मागणीवर परिणाम होत आहे. अल्पावधीत सोन्याचे भाव सध्याच्या पातळीवर राहतील. भू-राजकीय परिस्थिती ध्यानात आल्यानंतर आणि यूएस फेड आणि आरबीआयने 2025 च्या पहिल्या सहामाहीत व्याजदरात कपात केल्यानंतर सोन्याच्या किमती वाढतील.