Gold Rate : गेल्या काही महिन्यांपासून भारतात सोने आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढउतार दिसून येत आहेत. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत, काल (गुरुवारी) सोन्याचा दहा ग्रॅमचा दर 89 हजार 500 रुपयांवर गेला. जीएसटीसह हाच दर 92 हजार 185 रुपयांवर जातो. सव्वा महिन्यामध्ये सोने तब्बल 13 हजार 285 रुपयांनी महागलं आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरवाढीने सराफ बाजाराची सुरुवात झाली होती. जानेवारीच्या पहिल्याच दिवशी सोने तोळ्यामागे 1854 रुपयांनी महाग झालं होतं. तेव्हापासून सोन्याच्या दरामध्ये चढता आलेख दिसून येत आहे.


एक जानेवारीला सोन्याचा दर प्रति तोळा 78,880 रुपये होता. त्यानंतर सातत्याने सोन्याच्या दरात हजार ते दोन हजार रुपयांची वाढ होत राहिली. 31 डिसेंबर रोजी सोन्याचे दर प्रतितोळे 77 हजार रुपये एवढे होते. तेच नवीन वर्षात 78 हजार 800 रुपये प्रति तोळे झाले. सोनं महाग होऊनही मुंबईत काल (गुरूवारी) दिवसभरात 360 कोटींची उलाढाल झाल्याची माहिती आहे. दिवसभरात 40 टन सोन्याची विक्री झाली आहे. अशातच आता लग्नसराई सुरू होत असल्याने काही अंशी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. 


सोन्याच्या दरातील चढउतार ही गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या आजही तेवढीच असल्याचं दिसून येत आहे. लग्नसराईच्या तोंडावर सोने आणखी महाग होणाऱ्या शक्यता वर्तवली जात आहे. 15 मार्चपर्यंत एक लाख रुपये तोळे सोन्याचा दर असण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव आज 50 रुपयांनी वाढून 89,450 रुपये प्रति 10 ग्रॅम वरती पोहोचला आहे. चांदीचा भावही 700 रुपयांनी वाढून 1,00,300 रुपये प्रति किलो झाला आहे. 


फेब्रुवारी महिन्यात सोन्याची दमदार कामगिरी


4 फेब्रुवारी 2025 ला 10  ग्रॅम सोन्याचा दर 83010 रुपयांवर होता.
5 फेब्रुवारी 2025 ला 10  ग्रॅम सोन्याचा दर 84657 रुपयांवर होता.
6 फेब्रुवारीला सोनं 84672 रुपयांवर पोहोचलं होतं. 
7 फेब्रुवारीला सोन्याचा दर 84699 रुपयांवर पोहोचलं होता.
10 फेब्रुवारीचा दर 85665 रुपये इतका होता. 
11 फेब्रुवारीला सोन्याचा दर 85903 रुपयांवर पोहोचला होता.
20 फेब्रुवारीला सोन्याचा दर जीएसटीसह 92 हजार 185 रुपयांवर पोहोचला आहे.