Gold Prices At Record High : बुधवारी सोन्याने (Gold) सर्वकालीन उच्चांक गाठला. सोन्याच्या दरात (Gold Price) सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांमुळे सोन्याच्या दराने नवा विक्रमी उच्चांक (Gold Price New Record High) गाठला आहे. सोन्याचा दर 63,000 रुपये प्रति 10 ग्रॅम हून वधारत  63,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोने 62,750 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले होते. मजबूत जागतिक ट्रेंड दरम्यान, बुधवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली.


यापूर्वीचा दर किती?


गेल्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सोन्याचा भाव 62,750 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीचा भावही 800 रुपयांनी वाढून 79,000 रुपये किलो झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) सौमिल गांधी यांनी सांगितले की, "परदेशातील बाजारातील तेजीमुळे बुधवारी सोन्याचा भाव 750 रुपयांनी वाढून 63,500 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला."


जागतिक बाजारात सोने आणि चांदी दोन्ही मजबूत राहिले. सोने 2,041 डॉलर प्रति औंस आणि चांदी 24.95 डॉलर प्रति औंस झाली. कमोडिटी एक्स्चेंज कॉमेक्सवर सोन्याची किंमत 2,041 डॉलर प्रति औंसवर पोहोचली, जी मागील किंमतीपेक्षा 27 डॉलर अधिक आहे.


गांधी यांनी सांगितले की, डॉलरच्या कमकुवतपणाव्यतिरिक्त, फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्याने दिलेल्या विधानांवरून असे सूचित होते की यूएस मध्यवर्ती बँक पुढील वर्षी व्याजदर कमी करण्यास सुरुवात करेल. यामुळे कॉमेक्समधील सोन्याने मे महिन्यानंतरची सर्वोच्च पातळी गाठली. 


मात्र, सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने जे लोक सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. ऑक्‍टोबर 2023 च्या पहिल्या आठवड्यापासून सोन्याच्या किमती पुन्हा वाढल्या, जेव्हा सोन्याचा दर 56,630 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच दोन महिन्यांत सोन्याचा भाव जवळपास 7000 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे.