Gold Rate Today : जागतिक पातळीवर फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ युनायटेड स्टेटच्या वतीने ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता पाहता त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर (Gold Prices) झाला आहे. जळगावच्या (Jalgaon) सुवर्ण नगरीत गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
वाढत्या दरामुळे अनेकांनी सोने मोडीत काढले
अर्थसंकल्पानंतरच्या काळाचा विचार केला तर सोन्याच्या दरात सातत्याने दर वाढ झाली असल्याचं पाहायला मिळाले होते. जीएसटीसह 60 हजार रुपये इतकी मोठी उच्चांकी दरवाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोने खरेदी करणे अवाक्याबाहेर गेले होते. परिणामी अनेक ग्राहकांनी सोने खरेदी करणे थांबवले होते तर अनेकांनी तर वाढत्या दराचा फायदा घेत आपल्याकडील सोने मोडीत काढल्याचेही पाहायला मिळाले होते.
24 तासात सोन्याचे दरात एक हजार रुपयांची घसरण
मात्र गेल्या पंधरवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने कमी अधिक प्रमाणत घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळत असून गेल्या चोवीस तासात तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे जीएसटीशिवाय दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 56 हजार 300 रुपयांवरुन 55 हजार 300 रुपयांवर आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला असल्याने सोन्याच्या खरेदीकडे कल वाढला असल्याचं जळगावच्या सुवर्ण नगरीत पाहायला मिळत आहे.
...म्हणून ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला : सोने व्यावसायिक
जागतिक पातळीवर युनायटेड रिझर्व बँकेच्या वतीने ठेवीवर व्याज दर वाढवून देण्याबाबतचे संकेत बैठकीत देण्यात आले. याचा थेट परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट होऊन सोन्याच्या दरात एकाच दिवसात एका हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर कमी झाल्याने सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना ही संधी वाटू लागल्याने त्यांचा खरेदीकडे कल वाढला असल्याचं सोने व्यावसायिकांनी म्हटलं आहे.
या अॅपद्वारे दागिन्यांची शुद्धता तपासा
दरम्यान सोन्या-चांदीचे दर नेहमीच कमी-जास्त होत असतात. सकाळी पाहिलेले दर संध्याकाळपर्यंत सारखेच असतील याची खात्री देणं तसं कठीणच आहे. परंतु लग्नासाठी किंवा गुंतवणूक म्हणून देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला ठरु शकतो. तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.