Gold Prices Today:  अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इराण आणि इस्त्रायल यांच्यात 12 दिवस सुरु असलेला संघर्ष संपला. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केल्यानंतर त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर दिसून येत आहे. 24 जूनपासून सातत्यानं  सोन्याच्या दरात घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळालं. 22 एप्रिल रोजी पहिल्यांदा सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर लाखांच्या पार  गेले होते. त्यानंतर त्यादरामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

जून महिन्याचा शेवटचा दिवस आणि आठवड्याचा पहिला दिवस म्हणजेच सोमवारी (30 जून ) रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बाजार सुरु झाला तेव्हा 24 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 97583 रुपये इतके होते. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 89463 रुपये इतके होते. 22 कॅरेट सोनं आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 

मुंबई आणि नवी दिल्लीतील सोन्याचा दर

राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 89460 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 97583 रुपये इतका आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 89317 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 97437 रुपये इतका आहे.

आयटी हब असलेल्या बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 89305 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 97424 रुपये इतका आहे.  चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा दर  89311 रुपये तर 24 कॅरेटचा एका तोळ्याचा दर 97431 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट सोनं 10 ग्रॅम खरेदी करायचं असेल तर 97435 रुपये मोजावे लागतील तर 22 कॅरेट सोन्याचा दर 89315 रुपये इतका आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी तणाव कमी झाल्यानंतर आणि डॉलर कमी झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. स्पॉट गोल्ड 0.3 टक्के तेजीसह 3281.65 डॉलर प्रति औसला विकलं जात आहे.  

कॅनडाला अमेरिकेची धमकी 

रेअर अर्थच्या वॉशिंग्टनमधील शिपमेंटच्या प्ररणी चीन आणि अमेरिका यांच्यात सहमती झाली आहे. त्याचवेळी कॅनडाकडून अमेरिकेच्या फर्मवर टॅक्स लादला गेल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडासोबतची व्यापारी चर्चा थांबवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर नवं टॅरिफ लादू असा इशारा दिला आहे.