Gold Prices : सणासुदीच्या आणि लग्नाच्या हंगामापूर्वी सोन्याच्या किंमतीत (Gold Prices) मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळं दागिने खरेदीवर करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. गणेश चतुर्थीपासून सणासुदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुढील महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. सणासुदीच्या काळात किंवा लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जर तुम्ही या सणासुदीच्या काळात सोने किंवा त्याचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगले दिवस आले आहेत. कारण आता तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी पैसे खर्च करावे लागतील. गेल्या पाच महिन्यांत सोन्याचा भाव 5000 रुपयांनी कमी झाले आहेत.
5 महिन्यांत किंमती 8 टक्क्यांहून अधिक कमी
सराफा बाजारात सोन्याच्या दरात अवघ्या 7 सत्रात 2577 रुपयांनी घट झाली आहे. 5 मे 2023 शी तुलना केली तर त्या दिवशी सोन्याचा दर 61,646 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. जो इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार 4 ऑक्टोबर 2023 रोजी 56,627 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. म्हणजेच सोन्याचा भाव उच्चांकावरून 5019 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे.
भाव का कमी होत आहेत?
अमेरिका आणि युरोपमध्ये आता महागाई कमी होऊ लागली आहे. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर वाढलेला महागाईचा दर आता कमी होऊ लागला आहे. महागाई कमी झाल्यामुळं सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. त्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत होत आहे. येथून डॉलर आणखी मजबूत होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच डॉलरची मजबूती आणि सोन्याची मागणी घटल्याने सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. जगभरातील अर्थव्यवस्था वाईट काळातून सावरायला लागल्या आहेत. गेल्या वर्षी आर्थिक संकट पाहता गुंतवणूक वाचवण्यासाठी लोक सोने खरेदी करत होते. पण आता परिस्थिती बदलत आहे.
5 महिन्यांत चांदी 13 टक्क्यांहून अधिक स्वस्त
सोन्याच नव्हे तर चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 5 मे 2023 रोजी चांदीचा भाव 77 हजार 280 रुपये प्रति किलो होता. आज (4 ऑक्टोबर) बाजारत चांदीचा दर हा 67 हजार 91 रुपये प्रति किलोवर आला आहे. म्हणजेच 5 महिन्यांत चांदीची किंमत 10,189 रुपयांनी कमी झाली आहे. गेल्या 5 महिन्यांत चांदी 13 टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली आहे.
दिवाळीला सोनं-चांदी खरेदी करणारांसाठी मोठा दिलासा
सोन्या-चांदीच्या दरात घट झाल्यानं दिवाळी धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. किंमती कमी झाल्यामुळं सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी पूर्वीपेक्षा कमी पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळं मागणी वाढल्याचा फायदा व्यापाऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Jalgaon Gold Rate : पितृ पक्ष राहिला बाजूला, जळगावात सोने खरेदीसाठी झुंबड, दर पाहून तुम्हीही म्हणाल....