Gold Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत (Gold Rate) मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार 650 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागत आहे. चीनमध्ये वाढलेला कोरोना संसर्ग, डॉलरचा वधारलेला दर अशा अनेक कारणांमुळे सोनं महागल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. 


गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. आज सोन्याचे दर हे दहा ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी 49000 रुपये, तर जीएसटीसह हेच दर 56650 रुपयांवर पोहोचलं आहेत. सोन्याच्या दरांत वाढ झाल्याच्या किमतींच्या कारणाबाबत व्यापाऱ्यांनी वेगवेगळी कारणं सांगितली आहेत. यामध्ये प्रामुख्यानं सध्या चीनमध्ये पुन्हा वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव. तर दुसरं कारण वधारलेला डॉलरचा दर, तिसरं कारण म्हणजे, अमेरिकन फेडरल बँकांचे व्याजदर विषयक धोरण आणि चौथं कारण म्हणजे, तोंडावर आलेला ख्रिसमस. 


जगभरात असलेले अनेक व्यावसायिक सध्या ख्रिसमस सणात व्यस्त असल्यानं सोन्याच्या आवक आणि जावकवरही त्याचा परिणाम होऊन सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचा परिणामही सोन्याच्या दरांत वाढ होण्यावर झाल्याचा दोन व्यावसायिक सांगत आहेत. आगामी काळात दरांत अजूनहीही वाढ होण्याचा सोने व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. सोन्याचा दरांत झालेली वाढ पाहता ग्रहकांवर त्याचा मोठा परिणाम झालेला नसला तरीसुद्धा सर्वसामान्य ग्राहकांच्या मात्र अवाक्या बाहेरचे हे दर असल्यानं त्यांची मोठी निराशा झाली आहे. 


खामगावात चांदीचे दर वाढले; 65 हजारांवरुन चांदीचे दर 70,200 रु प्रतिकिलो


सोन्याच्या दरांत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरांतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरांत वाढ होत असताना आता चांदीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रजतनगरी म्हणून असलेल्या आणि देशातील चांदीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात चांदीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदीचा कालचा भाव प्रतिकिलो 70,200 इतका झाला आहे. गेल्या महिन्यात हाच भाव जवळपास 63 ते 64 हजार रु प्रतिकिलोच्या घरात असताना मात्र आता अचानक दरवाढ झाली आहे. याची वेगवेगळी कारणं व्यापारी सांगत आहेत. जगभरात कोरोना संकटानं पुन्हा आगमन केल्यानं ढासळलेला शेअर बाजार हे प्रमुख कारण मानलं जात आहे.