नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण होत असल्यानं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. कालच्या तुलनेत सोन्याचे दर आज घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 122149 रुपये एक तोळ्यावर पोहोचले आहेत. काल सकाळी सोन्याचा दर 122881 रुपयांवर होता. कालच्या तुलनेत सोन्याच दर 732 रुपयांनी घटला आहे. चांदीचा दर काल 155840 रुपयांवर होता. कालच्या तुलनेत चांदीचा दर 4465 रुपयांनी कमी झाला आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या दरानुसार 23 कॅरेट सोन्याचा दर 121660 रुपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 111888 रुपयांवर आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 91612 रुपये प्रतितोळा इतका आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 71457 रुपये प्रति तोळा आहे.
आठवड्यात सोन्याचे दर 3000 रुपयांनी घसरले
गेल्या आठवड्यातील शुक्रवारी इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या रिपोर्टनुसार सोन्याचा दर 125428 रुपये प्रति तोळा इतका होता. तर, 23 कॅरेट सोन्याचा दर 124794 रुपये प्रति तोळा होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याचा दर आठवड्यात 3009 रुपयांनी घटला आहे.
सोन्याच्या दराप्रमाणं चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. 14 नोव्हेंबरला चांदीचा दर 159367 रुपयांवर होता. त्यामध्ये 7992 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्याकाळात सोने आणि चांदीचे दर कमी होत असल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून दररोज दोनवेळा सोन्याचे दर जाहीर केले जातात. दुपारी 12 आणि सायंकाळी 5 वाजता सोन्याचे दर जाहीर केले जातात. आयबीजेएच्या दर आणि तुमच्या शहरातील सोन्याचे दर यामध्ये 1000 ते 2000 रुपयांचा फरक असेल. सोने खरेदीवर तीन टक्के जीएसटी द्यावा लागतो. याशिवाय मेकिंग चार्जेस देखील द्यावे लागतात.
सोन्याचे दर का वाढतात?
2025 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना जोरदार परतावा मिळाला आहे. 31 डिसेंबरला सोन्याचा दर 75 हजारांवर होता. तो सध्या 1 लाख 22 हजारांवर पोहोचला आहे. भूराजनैतिक संघर्ष आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. याशिवाय जेव्हा डॉलर कमजोर होतो तेव्हा सोनं इतर चलनात खरेदी करणाऱ्यांसाठी स्वस्त होतं. त्यावेळी सोन्याची मागणी वाढते.
अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दरात कपात करण्याची शक्यता असल्यास सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढते. याशिवाय जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोने खरेदी केली जात असल्यानं देखील सोन्याची मागणी वाढलेली आहे. विविध केंद्रीय बँकांकडून डॉलर ऐवजी सोने खरेदी करुन ठेवण्यास प्राधान्य दिलं जात आहे.