Go First Fliers Fumes:  गो फर्स्ट (GO First) एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. कंपनीकडून तीन आणि चार मे रोजीची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. कंपनीला इंजिनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे उड्डाणं रद्द करत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. कंपनीनं दिवाळखोरी घोषित करण्यासाठी NCLT कडे अर्ज केला असल्याचीही माहिती मिळत आहे. 


देशातील आणखी एक विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. वाडिया ग्रुपची एअरलाईन्स गो फर्स्टनं मंगळवारी एनसीएलटीमध्ये (NCLT) ऐच्छिक दिवाळखोरी प्रक्रियेसाठी (Voluntary Insolvancy Proceedings) अर्ज केला आहे. दरम्यान, गो फर्स्टची सर्व उड्डाणं आज (3 मे) आणि उद्या (4 मे) साठी रद्द करण्यात आली आहेत. गो-फर्स्ट एअरलाइन्सनं या निर्णयाची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) दिली आहे. अशा परिस्थितीत ज्या विमान प्रवाशांनी या दोन दिवसांसाठी कंपनीची तिकिटं काढली आहेत, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


उड्डाणं रद्द करण्याचं 'हे' कारण 


अहवालानुसार, गो फर्स्ट एअरलाईन्सला अनेक दिवसांपासून आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तेल कंपन्यांनी थकबाकी भरण्यास असमर्थता दर्शवल्यानं विमान कंपन्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणावर नजर टाकली तर आर्थिक संकटात सापडलेल्या विमान कंपनीसाठी इंजिन बनवणाऱ्या प्रॅट अँड व्हिटनी (Pratt & Whitney) या अमेरिकन कंपनीनं पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे कंपनीकडे निधीची मोठी कमतरता आहे. रोख रकमेअभावी कंपनी तेल कंपन्यांची थकबाकीही भरण्यास सक्षम नाही, त्यामुळे कंपन्यांनी गो फर्स्टला फ्युएल देण्यास नकार दिला आहे. या परिस्थितीत, GoFirst नं 3 आणि 4 मे रोजी सर्व उड्डाणं रद्द करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. 


सरकारची करडी नजर


नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, सरकार अडचणीत असलेल्या GoFirst एअरलाईनला शक्य ती सर्व मदत करत आहे. ते म्हणाले, 'सरकार गो फर्स्टला शक्य ती सर्व मदत करत असून, संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवलं जात आहे.'


प्रवाशांकडून DGCA कडे तक्रार 


अमेरिकन कंपनीकडून इंजिन न मिळाल्यानं कंपनीची अर्ध्याहून अधिक विमानं उड्डाण करू शकत नाहीत. अहवालानुसार, एअरलाईन्सची सुमारे 50 विमानं ग्राउंड करण्यात आली आहेत. त्यामुळे कंपनीच्या रोख रकमेवर वाईट परिणाम झाला आहे. मंगळवारी सोशल मीडियावर गो एअरची नियोजित उड्डाणं रद्द झाल्याच्या तक्रारींचा ओघ आला. या बातम्या वाचून तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि डीजीसीएकडे तक्रार केली आहे आणि बुकिंगवर परतावा देण्याची मागणी केली आहे.


DGCA ची कारणे दाखवा नोटिस


नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे नियामक (DGCA) ने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या GoFirst Airways च्या 3 आणि 4 मे रोजी दोन दिवस उड्डाणे रद्द करण्याच्या निर्णयाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विमान कंपन्यांनी कोणतीही माहिती न देता हा निर्णय घेतल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. डीजीसीएने सांगितले की GoFirst निश्चित वेळापत्रकाचे पालन करण्यात अयशस्वी ठरले आहे. ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल. 


कारणे दाखवा नोटीस बजावताना डीजीसीएने त्याच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे. GoFirst एअरलाईन्सने 24 तासांच्या आत उत्तर दाखल करणे आवश्यक आहे. नियामकाने विमान प्रवासासाठी तिकीट काढलेल्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी काय पावले उचलली आहेत याची माहिती देण्यासही सांगितले आहे. 5 मेपासून फ्लाइटच्या वेळापत्रकाचा तपशीलही विमान कंपन्यांना द्यावा लागणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Go First Airways : गो फर्स्ट एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर, 3 आणि 4 मेची सर्व उड्डाणे रद्द