Go First Airways: देशातील आणखी एक एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. वाडिया ग्रुपची एअरलाइन्स गो फर्स्टने 3 आणि 4 मे रोजीचे उड्डाणे रद्द केलं असून स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (NCLT) दिवाळखोरी घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांनी ही माहिती दिली आहे. विमान कंपन्यांनीही याबाबत केंद्र सरकारला कळवले असून लवकरच डीजीसीएसमोर (DGCA) सविस्तर अहवाल सादर करणार आहे.


GoFirst ने सांगितले की, इंजिन पुरवठ्यात वारंवार व्यत्यय आल्याने तिची अर्धी विमाने उड्डाण करू शकत नाहीत, त्यामुळे कंपनी आपली आर्थिक जबाबदारी पूर्ण करू शकत नाही. एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, दिवाळखोरीच्या निराकरणासाठी एनसीएलटीकडे जाण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. यासाठी कंपनीने इंजिन सप्लायर कंपनी प्रॅट अँड व्हिटनीवर (P&W) कडून इंजिन न मिळण्याचे सर्वात मोठे कारण दिले आहे. त्याने प्रॅट अँड व्हिटनीवर विमानाच्या इंजिनचे सुटे भाग दुरुस्त करण्यात आणि पुरवण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही केला आहे.


 






GoFirst India Limited ने सांगितले की, आमच्या जवळपास 50 टक्के विमाने इंजिनच्या समस्येमुळे तशीच पडून आहेत. याशिवाय ऑपरेशन कॉस्ट दुप्पट केल्यामुळे GoFirst चा 10,800 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. एअरलाइनने म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत कंपनी आपली आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्याच्या स्थितीत नाही, त्यामुळे एनसीएलटीकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे.


GoFirst ने सांगितले की, प्रवर्तकांकडून आतापर्यंत 6,500 कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. त्यापैकी 2,400 कोटी रुपये गेल्या 24 महिन्यांत गुंतवले गेले आहेत. एप्रिल 2023 मध्येच, प्रवर्तक समूहाने एअरलाइनमध्ये 290 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी, GoFirst ने 3 आणि 4 मे रोजी होणार्‍या उड्डाणे रद्द केल्या आहेत. तेल कंपन्यांची थकबाकी भरू न शकल्याने विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.


DGCA ची कारणे दाखवा नोटिस


नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे नियामक (DGCA) ने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या GoFirst Airways च्या 3 आणि 4 मे रोजी दोन दिवस उड्डाणे रद्द करण्याच्या निर्णयाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विमान कंपन्यांनी कोणतीही माहिती न देता हा निर्णय घेतल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. डीजीसीएने सांगितले की GoFirst निश्चित वेळापत्रकाचे पालन करण्यात अयशस्वी ठरले आहे. ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल. 


कारणे दाखवा नोटीस बजावताना डीजीसीएने त्याच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे. GoFirst एअरलाईन्सने 24 तासांच्या आत उत्तर दाखल करणे आवश्यक आहे. नियामकाने विमान प्रवासासाठी तिकीट काढलेल्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी काय पावले उचलली आहेत याची माहिती देण्यासही सांगितले आहे. 5 मेपासून फ्लाइटच्या वेळापत्रकाचा तपशीलही विमान कंपन्यांना द्यावा लागणार आहे.


ज्या प्रवाशांनी 3 आणि 4 मे रोजी GoFirst ने प्रवासासाठी तिकीट काढले होते, त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. सोशल मीडियावर हे प्रवासी विमान कंपन्यांच्या उड्डाण रद्द करण्याच्या निर्णयावर संतापले आहेत.