Gautam Adani Current Networth: काही महिन्यांपूर्वीच जगभरातील श्रीमंतीच्या यादीत टॉप तीनमध्ये असलेले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत मोठी घट झाली असली तरी, ते आजही देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. मागील तीन आढवड्यात अदानी समूहाच्या शेअरचे दर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीतही (Gautam Adani Net worth) पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. शेअरच्या वाढत्या दरामुळे गौतम अदानी यांची संपत्ती 50 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. ते जगभरातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीमध्ये दाखल होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहेत.    


चार महिन्यापूर्वी किती होती अदानी यांची संपत्ती?


गौतम अदानी यांची गणना आधी जगातील टॉप 3 श्रीमंतांमध्ये होत होती. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापासून फक्त एक पाऊल मागे होते. तेव्हा त्यांच्या पेक्षा श्रीमंत फक्त टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk Networth) आणि अॅमेझॉनचे जेफ बेझोस (Jeff Bezos Networth) हे होते. मागील वर्षी त्यांची ही स्थिती होती. यानंतर त्यांचे संपत्ती सातत्याने वाढत गेली. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकच्या आकडेवारी (Bloomberg Billionaires Index) अनुसार, अडाणी यांची एकूण संपत्ती (Gautam Adani Total Net Worth) 31 ऑक्टोबर 2022 मध्ये 143 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली होती.    


Gautam Adani Current Networth: हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला बसला मोठा फटका 


जानेवारीमध्ये अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुमारे महिनाभर जोरदार घसरण झाली. 24 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात हिंडेनबर्ग यांनी अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अहवालात अदानी समूहाच्या शेअर्सचे मूल्य खूप जास्त असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय शेअर्सच्या किमतीत फेरफार करण्यासह इतर अनेक आरोपही करण्यात आले. या अहवालामुळे अदानीच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती 80 टक्क्यांपर्यंत घसरल्या. समूहातील 10 सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप 12.06 लाख रुपयांनी घटले. यामुळे गौतम अदानी यांची संपत्ती केवळ 40 बिलियन डॉलर्स पेक्षा कमी झाली होती आणि त्यांना अवघ्या एका महिन्यात 80 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले होते.


Gautam Adani Current Networth: श्रीमंतांच्या यादीत आता किती क्रमांकावर आहेत अदानी? 


ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती फक्त 37.7 बिलियन होती. सध्या, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 57.5 बिलियन झाली आहे. म्हणजेच गेल्या तीन आठवड्यांत त्यांच्या संपत्तीत सुमारे 20 बिलियन म्हणजेच 52.52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासह अदानी आता श्रीमंतांच्या यादीत 21 व्या स्थानावर पोहोचले आहे. अॅलिस वॉल्टन 61.5 अब्ज डॉलरसह 20 व्या स्थानावर आहे.