INDIAN EQUITIES IN SEPTEMBER : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारात आतापर्यंत 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याची गुंतवणूक जगभरातील मध्यवर्ती बँका, विशेषत: यूएस फेडरल रिझव्‍‌र्ह, चलनवाढीचा दर कमी होत असताना व्याजदर वाढीबाबत काहीशी नरम भूमिका घेऊ शकतात, या अनुमानांवर आधारित आहेत. 


आर्थिक वाढ कायम राहण्याची अपेक्षा
डिपॉझिटरी डेटाच्या माहितीनुसार 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 12 हजार 084 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सतत आर्थिक विकास गतीच्या अपेक्षेने परदेशी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार राहिल्याचं पाहायला मिळालं.


फेडरल रिझर्व्ह दर वाढीबाबत मवाळ भूमिका स्वीकारू शकते
जागतिक मध्यवर्ती बँक, विशेषत: फेडरल रिझर्व्ह, महागाई कमी होण्यास सुरुवात झाल्यावर दर वाढीबाबत नरम भूमिका घेईल या अपेक्षेने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत असं असोसिएट डायरेक्टर-मॅनेजर रिसर्च, मॉर्निंगस्टार इंडिया हिमांशू श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.


ऑगस्टमध्ये FPIs ने भारतीय बाजारपेठेत 51,200 कोटी रुपये गुंतवले
या आकडेवारीनुसार, FPIs ने ऑगस्टमध्ये भारतीय बाजारपेठेत 51,200 कोटी रुपये आणि जुलैमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सलग नऊ महिने भारतीय शेअर बाजारातून बाहेर पडल्यानंतर जुलैमध्ये परदेशी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार बनले. यापूर्वी, ऑक्टोबर 2021 ते जून 2022 दरम्यान, विदेशी गुंतवणूकदारांनी  भारतीय शेअर बाजारातून सुमारे 2.46 लाख कोटी रुपये काढले होते.


FPI ची भूमिका आगामी काळात अस्थिर राहील
आर्थिक मजबुती, वाढती महागाई आणि भौगोलिक-राजकीय चिंता लक्षात घेता, आगामी काळात FPIs चा कल अस्थिर राहील अशी प्रतिक्रिया कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल), श्रीकांत चौहान यांनी दिली आहे.


बाजाराची परिस्थिती काय असेल?
दरम्यान गेल्या काही दिवसांत भारतीय शेअर बाजारात सातत्याने उसळी बघायला मिळते आहे. ज्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५८ ते ६० हजाराच्या दरम्यान पाहायला मिळाला होता तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीदेखील १७ हजाराच्या पुढे दिसला. परदेशी गुंतवणूकदार भारतातील आर्थिक परिस्थिती ही इतर देशांच्या तुलनेत स्थिर असल्याने परतल्याचे जाणकार सांगत आहेत. त्यामुळे आता बाजारात परदेशी गुंतवणूकदार खरेदीदार राहिला तर नक्कीच आगामी काळात भारतीय बाजारात मोठी उसळी बघायाला मिळू शकते असा अंदाज आहे.