FPI Investment: जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीचं संकटानं धाकधूक वाढवली आहे. चीन (China), अमेरिकासह (America) जगभरात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यातच जगभरात आर्थिक मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकासह सर्वच देश मंदीच्या सावटाखाली असतानाच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकधारकांनी (एफपीआय) भारतीय शेअर बाजारांतून 5,900 कोटी रुपये काढले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकधारकांनी (FPI) भारतीय बाजारांबाबत सावध दृष्टिकोन स्वीकारला आहे.


भारतीय बाजारांतून काढले 5872 कोटी रुपये 


कोटक सिक्योरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल) प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले की,  "पुढील काही दिवसांत जीडीपीची (GDP) वाढ हा चिंतेचा विषय राहणार आहेच. त्याशिवाय जागतिक बाजारातील उच्च व्याजदर आणि तिसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या कमकुवत निकालांच्या शक्यतेमुळं एफपीआयचा कल अस्थिर राहू शकतो. डिपॉजिटरीच्या आकडेवारीनुसार, दोन ते सहा जानेवारीच्या दरम्यान एफपीआयनं भारतीय शेअर बाजारातून निव्वळ 5,872 कोटी रुपये काढले आहेत. 


गेल्या 11 सत्रांपासून एफपीआय विक्रेते


मागील अकरा सत्रांपासून एफपीआय फक्त विक्रेते राहिले आहेत. या अकरा सत्रांमध्ये एफपीआयनं 14,300 कोटी रुपयांचे शेअर विकले आहेत. याआधी एफपीआयनं डिसेंबरमध्ये शेअरमध्ये 11,119 कोटी आणि नोव्हेंबरमध्ये  36,239 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.  


गेल्या वर्षभरात काढले 1.21 कोटी 


मागील एक वर्षभरात म्हणजेच,  2022 मध्ये एफपीआयनं भारतीय शेअर बाजारांतून  1.21 लाख कोटी रुपये काढले आहेत. अमेरिका फेडरल रिझर्व्ह बँक आणि इतर मध्यवती बँकानी व्याजदरात मोठी वाढ केली. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता, वस्तूंच्या चढ्या किमती आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे गेल्या वर्षभरात एफपीआयची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
 
एफपीआय भारतीय बाजारापासून अंतर का ठेवतंय?


मॉर्निंगस्टार इंडियाचे सहायक संचालक व्यवस्थापक हिमांशु श्रीवास्तव म्हणाले की, "जगातील काही भागांत कोरोना संक्रमण पुन्हा एकदा वेगानं वाढत आहे. त्याशिवाय अमेरिकेत मंदीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एफपीआय भारतासारख्या वाढत्या बाजारातून दूर राहतेय." 


जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेअर्सशिवाय एफपीआयनं लोन, बाँड बाजारातून 1,240 कोटी रुपये काढले आहेत. भारताशिवाय तायवान आणि इंडोनिशिया बाजारातून एफपीआयचा प्रवाह नकारात्मक झाला आहे. फिलिपीन्स, दक्षिण कोरिया आणि थायलँडमधील बाजारातील प्रवाह सकारात्मक राहिलाय.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPO News : नवीन वर्षात कमाईची संधी! झिंक ऑक्साईड उत्पादक कंपनीचा आयपीओ होणार सुचीबद्ध