Share Market Update: सोमवारचा दिवस शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. मागील आठवड्या प्रमाणे या आठवड्यातही शेअर बाजारात घसरण दिसून आली. बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्समध्ये 1170 आणि निफ्टीमध्ये 350 अंकाची घसरण झाली. सेन्सेक्स 58,465 आणि निफ्टी 17,416 अंकावर बंद झाला. 


आज शेअर बाजार सुरू झाल्यानंतर 400 अंकाची घसरण दिसून आली. त्यानंतर सेन्सेक्समध्ये 1698 अंकाची घसरण झाली होती. त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरला. अखेर बाजार बंद झाला तेव्हा 1170.12 अंकाची घसरण नोंदवण्यात आली. निफ्टीमध्येही घसरण झाली. बाजार सुरू झाल्यानंतर निफ्टीमध्ये 129.85 अंकाची घसरण होत 17,634.95 पर्यंत पोहचला. बाजार बंद झाला तेव्हा निफ्टीत 348.25 अंकाची घसरण झाली आणि 17,416.55 अंकावर बंद झाला.  शेअर बाजारातील जवळपास सर्वच क्षेत्रात घसरण दिसून आली. बँकिंग, ऑटो, आयटी, अर्थ सेवा आणि एफएमसीजी सारख्या क्षेत्रात मोठी घसरण दिसून आली. 


रिलायन्स इंडस्ट्रीने सौदी अरामकोसोबत 15 अब्ज डॉलरचा तेल रिफायनरी आणि पेट्रोलियम पदार्थाच्या व्यवसायातील 20 टक्के भागिदारीचा प्रस्तावित व्यवहार थांबवला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये चार टक्क्यांनी घसरण झाली. रिलायन्स आणि सौदी अरामकोमधील करारावर पुन्हा विचार होणार असल्याच्या वृत्ताने गुंतवणुकदार धास्तावल्याने रिलायन्सचा शेअर कोसळला असल्याचे म्हटले जाते. आजच्या घसरणीनंतर रिलायन्सचा मार्केट कॅप 9 अब्ज डॉलर म्हणजे 66 हजार कोटींनी कमी झाला. बजाज फायन्सास, बजाज फिनसर्व, एनटीपीसी, एसबीआय, टायटन यासारख्या कंपन्यांचे शेअर दरही कोसळले.  तर, दुसरीकडे भारतीय एअरटेल, एशियन पेंट्स, पॉवरग्रिड आणि इंडसइंड बँकेचे शेअर वधारले असल्याचे दिसून आले. 


पेटीएम शेअर बाजार निर्देशांकात सूचीबद्ध झाल्याच्या दुसऱ्या दिवशीही घसरण सुरू होती. PayTmचा शेअर दुसऱ्या दिवशी 1248 रुपयांपर्यंत घसरला होता. बाजार बंद होईपर्यंत 12.99 टक्के घसरणीसह 1359 रुपये प्रति शेअर दरावर बाजार बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप एक लाख कोटींहून कमी झाले आहे. मार्केट कॅप आता 88 हजार 139 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


स्टॉक गुरू गुजराल म्हणतात, पैसा सर्वस्व नाही, राकेश चालू शकत नाही आणि मी...


म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'हा' नियम ठाऊक आहे का? 15 वर्षात होऊ शकता करोडपती